Maratha Reservation : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी ऋषीकेश बेदरेला जामीन मंजूर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Maratha Reservation : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषीकेश बेदरे याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जालना, 18 डिसेंबर (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याचा जामीन अर्ज अंबड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला. 25 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. यामुळे ऋषिकेश बेदरेला दिलासा मिळाला. त्यामुळे त्याची आज कारागृहातून सुटका करण्यात आली. 29 नोव्हेंबरला बेदरे कडुन पिस्तुल व दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार दुसरा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला होता.
ऋषिकेश बेदरे याची वाढीव पोलीस कोठडी 4 डिसेंबरला संपल्याने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बेदरेच्या वकीलाने लगेच जामीन अर्ज केला होता. मात्र, प्रथमवर्ग न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यामुळे ऋषिकेश बेदरेची रवानगी जालना मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. बेदरेच्या वकिलाने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाद मागुन जामीन मिळवला.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. जालना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज करत अश्रू धुराचा देखील प्रयोग केला. या घटनेमध्ये अनेक आंदोलकांसह पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. ऋषिकेश बेदरे या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
advertisement
कोण आहे ऋषिकेश बेदरे?
ऋषिकेश बेदरेची क्राईम हिस्ट्री आता पोलिसांच्या समोर आली आहे. अंतरवाली सराटीतील दगडफेक प्रकरणाचा प्रमुख आरोपी म्हणून ऋषिकेशवर संशय घेतला जातोय. ऋषिकेशवर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
दगडफेक केल्याचा आरोप असलेला बेदरे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होता. 1 सप्टेंबरच्या दुपारी अंतरवाली सराटी गावात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. ही घटना घडून गेल्यानंतर मधल्या काळात राजकारण बरंच तापलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनाप्रकरणावरुन माफीही मागितली होती. तसंच जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची बदलीही करण्यात आली होती. तसंच अटक करण्यात आलेल्या आरोपी ऋषिकेश बेदरे याच्याकडे गावठी पिस्तुलही आढळून आलं होतं. मनोज जरांगे यांनी अंतरवाली झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीत आपले आंदोलक नव्हते, असंही म्हटलं होतं. अंतरवाली सराटीतील आंदोलनात काही उपद्रवी लोकं घुसली होती, असा दाट संशय आता व्यक्त केला जातोय.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 18, 2023 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maratha Reservation : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी ऋषीकेश बेदरेला जामीन मंजूर








