ते गुंड मलाच विधान भवनात मारायला आले होते... जितेंद्र आव्हाड मोठ्याने ओरडले, धमकीचे मेसेज दाखवले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jitendra Awhad: नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला शाब्दिक वाद आता गुद्द्यांवर येऊन पोहोचला आहे. दोघा नेत्यांमध्ये काल शिवीगाळीची घटना घडल्यानंतर आज एकमेकांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. अधिवेशन सुरू असताना आणि विधान भवनाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना विधान भवनाच्या द्वाराजवळच हा सगळा प्रकार घडल्याने आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे.
नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच विधानसभेत मारहाणीचा मुद्दा उपस्थित करून या सगळ्या घटनेची माहिती अध्यक्षांनी घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली.
पडळकरांच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे मेसेज दाखवले
विधिमंडळ परिसरात असलेल्या माध्यम कक्षात जितेंद्र आव्हाड यांनी मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. सहा टर्मच्या आमदाराला धमक्यांचे फोन येत असतील, खुलेआम शिव्या दिल्या जात असतील तर आम्ही कशाला आमदार आहोत? आमच्या सुरक्षेचे काय? कोण घेणार आमची जबाबदारी? असे सवाल विचारीत ज्या गुंडांनी नितीन देशमुख यांना मारहाण केली ते मलाच विधान भवनात मारायला आले होते, असा सनसनाटी आरोप आव्हाड यांनी केला. तसेच पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी पाठवलेले धमकीचे मेसेजही दाखवले.
advertisement
अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करून जितेंद्र आव्हाड बाहेर आले. त्याचवेळी लॉबीत असलेल्या नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसते. जवळपास २ मिनिटे मारहाण सुरू होती. जिथून आमदार मंत्री विधान सभेत प्रवेश करतात, तिथेच ही मारहाण झाल्याने विधान भवनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला आठवडाभराची पार्श्वभूमी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांचा मंगळसूत्र चोर अशा उल्लेख केला होता. तर पडळकरांकडून आव्हाडांना अर्बन नक्सलची उपमा दिली गेली होती. काल विधान भवनाच्या द्वारात पुन्हा एकदा पडळकर आणि आव्हाड यांच्यात वाद झाला होता. कालच्या घटनेवेळी आव्हाड आणि पडळकर यांच्यासोबत जे लोक होते, तेच लोक आज पुन्हा समोर आले, तेव्हा नजरानजर होताच थेट मारहाणीला सुरुवात झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ते गुंड मलाच विधान भवनात मारायला आले होते... जितेंद्र आव्हाड मोठ्याने ओरडले, धमकीचे मेसेज दाखवले