शरद पवार यांचा फोन येईल याची आम्हाला भीती वाटते, पण त्यांना.... सांगलीत जाऊन आव्हाडांनी पडळकरांना सुनावले

Last Updated:

जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपच्या नव्या संस्कृतीकडे बोट दाखवून वरिष्ठ नेतृत्वाचा धाक वाटत नसल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत असल्याचे म्हटले.

गोपीचंद पडळकर-जितेंद्र आव्हाड
गोपीचंद पडळकर-जितेंद्र आव्हाड
असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने राज्यभरातून त्यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपच्या नव्या संस्कृतीकडे बोट दाखवून वरिष्ठ नेतृत्वाचा धाक वाटत नसल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी गोपीचंद पडळकर यांची टीका, सुप्रिया सुळे यांची आर्थिक आधारावरील आरक्षणाची मागणी, अशा विषयांवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली, एकमेकांबद्दल सन्मान उरला नाही

आव्हाड म्हणाले, पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. एखाद्याच्या मातृत्व आणि पितृत्वावर जाऊन टीका करणे असे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडले नाही. त्यांच्या टीकेमुळे महाराष्ट्रालाही दुःख झाले. मी आणि जयंत पाटील प्रचंड मातृभक्त आहे. आपल्या आईवर जर कुणी बोलत असेल तर दु:ख होणारच की... महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. किंबहुना महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीने अतिशय खालची पातळी गाठली आहे. अशी महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही.
advertisement

शरद पवार आमचा कान पकडतील, याची भीती असते पण समोरच्यांना...

राजकारणात एक दुसऱ्यांचा सन्मान करावा करावा, राजकारणात मतभेद असतात. आमच्याकडून अशी टीका झाली असती तर आमच्या मनात भीती असते की शरद पवार आम्हाला फोन करतील, आम्हाला त्यांची भीती असते. ते आमचे कान पकडतील, याची भीती असते. पण आज टीका करणाऱ्यांना त्यांच्या नेतृत्वाची भीती वाटत नाही, हे स्पष्ट आहे, असे आव्हाड म्हणाले.
advertisement

राजाराम बापू पाटील हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते

राजाराम बापू पाटील हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना इंदिरा गांधी त्यांना मुख्यमंत्रिपदावर बसवणार होते. गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, पोलीस कारवाई करणार नाहीत, हे आम्हालाही माहित आहे, असेही आव्हाड म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार यांचा फोन येईल याची आम्हाला भीती वाटते, पण त्यांना.... सांगलीत जाऊन आव्हाडांनी पडळकरांना सुनावले
Next Article