Kalyan Dombivli : पाठिंब्याची अतिघाई मनसेला नडली, महापौरपदाची संधी हुकली, कल्याण-डोंबिवलीमध्ये राजू पाटलांचा गेम कसा फसला!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
KDMC Mayor : शिंदे गटासोबत मनसेने युती केल्यानंतर भाजपची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सगळा गेमच फिरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्यानंतर भाजप पालिका राजकारणात एकाकी पडली आहे. शिंदे गटासोबत मनसेने युती केल्यानंतर भाजपची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सगळा गेमच फिरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गुरुवारी, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता मात्र, या राजकीय गणितात मनसेच्या हक्काचे महापौरपद हुकल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी 'अतिघाई' केली का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
तर मनसेला होती महापौर पदाची संधी...
यंदा कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. भाजपच्या गोटात या प्रवर्गातील नगरसेवक नाहीत, तर मनसेकडे शीतल मंढारी यांच्या रूपाने एसटी प्रवर्गातील नगरसेविका उपलब्ध आहेत. जर मनसेने भाजपला पाठिंबा दिला असता, तर भाजपने आपल्या संख्याबळाच्या जोरावर मनसेच्या एकमेव नगरसेविकेला महापौरपदी बसवून पालिकेचा गाडा हाकला असता. मात्र, मनसेने शिंदे गटाला साथ दिल्याने ही सुवर्णसंधी मनसेच्या हातातून निसटल्याचे बोलले जात आहे.
advertisement
पडद्यामागून 'शिंदे' गटाशी युती?
निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजपमध्ये जवळीक असल्याचे चित्र होते. मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला गाफील ठेवून मनसे नेत्यांनी पडद्यामागून शिंदे गटाच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाही, अखेर मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
advertisement
राजू पाटील यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
मनसेच्या पाच नगरसेवकांनी भाजपला साथ दिली असती तर शीतल मंढारी यांना 'लॉटरी' लागली असती. "राजू पाटील यांनी अतिघाई केल्याने पक्षाचे नुकसान झाले," अशी कुजबुज आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मनसेच्या या 'लवचिक' भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसला असला, तरी सत्तेच्या चाव्या हाती घेण्याची संधी मनसेने स्वतःहून गमावल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 11:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Dombivli : पाठिंब्याची अतिघाई मनसेला नडली, महापौरपदाची संधी हुकली, कल्याण-डोंबिवलीमध्ये राजू पाटलांचा गेम कसा फसला!









