Kalyan Durgadi Jatra : दुर्गाडी जत्रेमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ ? आकाश पाळणा आणि झोक्यांच्या सुरक्षेमध्ये प्रश्न
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Kalyan Durgadi Jatra News : कल्याणच्या दुर्गाडी जत्रेबद्दलची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जत्रेमध्ये लावण्यात आलेल्या गगनभेदी पाळणे, झुले आणि खेळणी हेच आता जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे. या ठिकाणी भव्य जत्रा देखील भरली आहे. देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेमध्ये आनंद घेण्यासाठी कल्याणसह आजूबाजूच्या शहरातून भाविक येत असतात. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या जत्रेबद्दलची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जत्रेमध्ये लावण्यात आलेल्या गगनभेदी पाळणे, झुले आणि खेळणी हेच आता जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याणमध्ये असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवामध्ये इथे जत्रा असते. देवीच्या जत्रेसाठी उभारण्यात आलेले अवजड आकाश पाळणे आणि झुले हे एका खड्ड्यात भराव करून लावण्यात आले असल्याची माहिती आता समोर आली आहे. या ठिकाणी जमीन भुसभुशीत असून अवजड खेळण्यांचा तोल सांभाळण्यासाठी खाली केवळ दगड आणि लोखंडी सळ्या टाकून तात्पुरता आधार देण्यात आला आहे. त्यातच दररोज पडणार्या पावसामुळे ही जमीन आणखी चिखलमय झाली आहे. इतक्या जीवघेण्या जागेवर आकाश पाळणे लावण्यात आले आहेत, याची कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने अद्यापही पाहणी केली नाहीये का ? स्थानिक आमदारांनी त्या जागेची पाहणी नाही केली का ?
advertisement
आकाश पाळण्याचे आणि झुल्यांचे मालक आपली रोजी रोटी भागवण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाचा खेळ करत आहेत का ? असा प्रश्न सध्या उद्भवत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या ह्या देवीच्या उत्सवामध्ये कोणती विचित्र घडू नये म्हणजे झालं. परिणामी या मोठ्या खेळण्यांच्या सामानांचा तोल कायम राहील की नाही ? याबद्दलचा संशय सर्वांकडूनच व्यक्त केला जात आहे. चिखलमय आणि दलदलीसारखी झालेली ही जागा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत आहे. या वेगवेगळ्या खेळण्यांचा आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक घेताना दिसत आहेत.
advertisement
मात्र, भुसभुशीत असलेल्या ह्या जमिनीत खेळण्यांना व्यवस्थित आधार मिळत नसल्याने कधीही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, अशी भीती कल्याणकरांकडून व्यक्त केली जात आहे. भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे लक्षात घेता, संबंधित पोलिस प्रशासन, महानगरपालिका व महत्त्वाचे संबंधित अधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून या पाळण्यांची तपासणी करावी, आवश्यक तेथे नोटीस बजावून असुरक्षित खेळणी त्वरित बंद करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 28, 2025 6:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Durgadi Jatra : दुर्गाडी जत्रेमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ ? आकाश पाळणा आणि झोक्यांच्या सुरक्षेमध्ये प्रश्न