विशाळगडावर बकरी ईदनिमित्त कुर्बानीला परवानगी, पण ती अट पाळावीच लागणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Vishalgad: ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आलीये. परंतु, उच्च न्यायालयाच्या काही अटींचे पालन करावे लागणार आहे.
कोल्हापूर : ऐतिहासिक विशाळगड येथे बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिलीये. किल्ल्यावरील हजरत पीर मलिक रेहान दर्गा येथे ईद आणि उरुसाच्या पार्श्वभूीवर 7 जून ते 12 जून दरम्यान प्राण्यांची कुर्बानी देता येईल. याबाबत न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
विशाळगडावर पशुबळी देण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात दर्गा ट्रस्टतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी अॅड. सतीश तळेकर व अॅड. माधवी अय्यपन यांनी याचिकादारांची बाजू मांडली. तर, अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे व अॅड. कविता सोळुंके यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.
advertisement
ही अट पाळावी लागणार
मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडावर कुर्बानीला सशर्त परवानगी दिली आहे. दर्ग्यापासून सुमारे 1.4 किलोमीटर अंतरावर खासगी जागेत बंदिस्त ठिकाणी कुर्बानी दिली जाईल, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून 7 ते 12 जून दरम्यान कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दर्ग्याच्या भाविकांना आता 6 दिवस विशाळगडावर कुर्बानी देता येईल.
advertisement
दरम्यान, गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारची याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. तेव्हा देखील न्यायालयाने सशर्त कुर्बानीला परवानगी दिली होती. मात्र, सार्वजनिक जागी किंवा खुल्या जागी कुर्बानी न देता गट नं 19 येथील मुबारक मुजावर यांच्या खासगी, बंदिस्त जागेत कुर्बानी करावी, अशी अट असणार आहे. कुर्बानीला परवानगी असेल, परंतु, निकालपत्रातील सर्व अटींची पूर्तता होणे गरजेचे असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 04, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
विशाळगडावर बकरी ईदनिमित्त कुर्बानीला परवानगी, पण ती अट पाळावीच लागणार