दिवाळीत का फोडतात फटाके? धर्मशास्त्रात सांगितलंय महत्त्वाचं कारण
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीमध्ये फटाके फोडणे ही काही नव्याने निर्माण झालेली परंपरा नाही.
कोल्हापूर, 11 नोव्हेंबर: दिवाळीमध्ये फटाके फोडणे कुणाला आवडत नाही असं नाही. जे लोक प्रदूषणाचे कारण पुढे करतात, तेही कित्येकदा पर्यायी प्रदूषण विरहित फटाके फोडत असतात. मात्र दिवाळी सणाकळी फटाके नेमके का फोडले जातात? किंवा ही परंपरा नेमकी काय आहे ? हे बहुधा कुणालाच माहिती नाहीये. पण 'दिवाळीमध्ये फटाके फोडणे' हे दिवाळी सणातील एक महत्त्वाचे कार्य असून त्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे. याबाबत आपल्या धर्मशास्त्रात सांगण्यात आल्याचे कोल्हापुरातील मंदिर आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक असलेले उमाकांत राणिंगा यांनी सांगितले.
आजकाल फटाक्यांमुळे प्रदुषण होत असल्याने फटाके फोडू नका असे सांगितले जाते. पण दिवाळीमध्ये फटाके फोडणे ही काही नव्याने निर्माण झालेली परंपरा नाही. या संदर्भात धर्म ग्रंथांचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा 'दशमहाविद्या रहस्यम् ' ग्रंथात या गोष्टीचे संपूर्ण स्पष्टीकरण आणि वैज्ञानिक उलगडा दिलेला पाहायला मिळाला, असं राणिंगा सांगतात.
advertisement
फटाके फोडण्यामागे काय आहे कारण?
दशमहाविद्या म्हणजे पृथ्वीच्या वेगवेगळ्या ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या दहा अवस्था होय. याच बाबतीत हा ग्रंथ माहिती देतो. पृथ्वीची या दहा अवस्थांपैकी धुमावती अवस्था असते, तेव्हा त्रि तेजाचा लोप होतो, असे सांगण्यात आले आहे. या त्रितेजांपैकी पहिले म्हणजे सूर्य. कन्या राशीमध्ये सूर्य असताना सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्तीत जास्त असते. त्यामुळे ऋतुमानाप्रमाणे हिवाळा असल्यामुळे सूर्याचे तेज कमी असते. वर्षाऋतू नुकताच संपला असल्यामुळे पृथ्वीच्या पोटातील अग्नीचे तेजही मंदावलेले असते. त्याचबरोबर अमावस्या असल्यामुळे चंद्राचेही तेज उपलब्ध नसते.
advertisement
अशा प्रकारे त्रितेजाच्या अभावामुळे उत्पन्न झालेल्या तमोभावाच्या निराकरणासाठी आणि कमला देवीच्या आगमनाच्या हेतूने घरात, पाणवठ्यावर किंवा गावच्या वेशीवर दिवे लावावेत आणि अग्निक्रिडा (आतिषबाजी) करण्यास ऋषीमुनींनी सांगितलेले आहे. त्यातील अग्निक्रिडा म्हणजे बांबूपासून बनवलेल्या फटक्यांपासून प्रकाश पाडणे, असा उल्लेख दशमहाविद्या रहस्यम ग्रंथात आढळतो, असेही उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यावरून हेही स्पष्ट होते की हिंदू धर्मात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सवातील प्रत्येक कृतीमागे काही ना काही वैज्ञानिक आणि धार्मिक कारण नक्की जोडले गेले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 12, 2023 9:28 AM IST