राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, कोल्हापुरात पुन्हा येणार महापूर?, VIDEO समोर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
सध्या राधानगरी धरण हे पूर्णपणे भरले असून सकाळी 6 नंबरचा एकच स्वयंचलित दरवाजा उघडला होता. त्यामुळे या 6 नंबरच्या दरवाजातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. मात्र, सर्व नागरिकांचे लक्ष राधानगरी धरणाचे दरवाजे याकडे लागले होते. अखेर राधानगरी धरणाचे एकूण 4 स्वयंचलित दरवाजे आज 25 जुलै रोजी उघडले आहेत.
सकाळी आधी 6 नंबरचा, नंतर 5, 3 आणि 4 नंबरचा दरवाजा, असे 4 स्वयंचलित दरवाजे दुपारी 12 पर्यंत उघडले आहेत. त्यामुळे सध्या धोका पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळी अजूनच वाढ होणार असल्याने नदी काठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
25 जुलै रोजी राधानगरी धरण भरल्यानंतर कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकत असल्यामुळे शेतकऱ्यांसह नदीकाठच्या गावातील नागरीकांना या एकाच गोष्टीची चिंता सतावत होती. आता धरणातून भोगावती नदीपात्रात सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगत स्थलांतरित होणेच योग्य ठरते. त्याबाबतीत जिल्हा प्रशासनाने आधीच 2019 आणि 2021 च्या पुरात बाधित ठरलेल्यांना स्थलांतरीत होण्यासाठी समान बांधून तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
advertisement
किती सुरु आहे विसर्ग?
सध्या राधानगरी धरण हे पूर्णपणे भरले असून सकाळी 6 नंबरचा एकच स्वयंचलित दरवाजा उघडला होता. त्यामुळे या 6 नंबरच्या दरवाजातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यानंतर एकेक करून 3, 4 आणि 5 नंबर असे एकूण 4 दरवाजे उघडले. प्रत्येक दरवाजातून 1428 क्युसेक पाणी तर पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 7212 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात सुरू आहे.
advertisement
पंचगंगा नदीची पाणीपातळी -
आज 25 जुलै रोजी राजाराम बंधारा याठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट ही धोका पातळी ओलांडून वाहत आहे. सध्या दुपारी 1 वाजताच्या आकडेवारीनुसार नदीची पातळी 43 फूट 2 इंच इतकी होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 84 बंधारे पाण्याखाली गेले होते. आता धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढल्याने नदीची पाणीपातळी अजून 7 ते 8 फूट देखील वाढू शकते. मात्र, त्याला काही तासांचा अवधी लागत असल्याने नागरिकांनी लगेच घाबरून जाण्याची गरज नाही, असे देखील जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
advertisement
कसा उघडतो स्वयंचलित दरवाजा -
कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी राधानगरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी धरण बांधले होते. या धरणामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. या धरणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे आहे. धरणातील पाणीसाठा वाढला की धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होऊ लागतो. हे स्वयंचलित दरवाजे त्यावर पडणाऱ्या पाण्याच्या आणि वाऱ्याच्या दबावामुळे आपोआप उघडले जातात.
advertisement
दरम्यान, आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने जिल्हा प्रशासन आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ टीमची एक तुकडीही अलर्ट मोडवर आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 25, 2024 2:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, कोल्हापुरात पुन्हा येणार महापूर?, VIDEO समोर