पर्यावरणाच्या रक्षणासाठी गाव झालं एकत्र, 17 वर्षांपासून सुरूय मूर्तीदानाची चळवळ

Last Updated:

अनेकजण सध्या पर्यावरणपुरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत असतात. महाराष्ट्रातील एका गावाने गेल्या 17 वर्षांपासून मूर्तीदानाची अनोखी चळवळ सुरू केलीय.

+
पर्यावरणाच्या

पर्यावरणाच्या रक्षणासाठी गाव झालं एकत्र, 17 वर्षांपासून सुरूय मूर्तीदानाची चळवळ

कोल्हापूर, 25 सप्टेंबर: घरगुती गणपती विसर्जना वेळी कोल्हापुरात नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करणे यावरून वादंग निर्माण झालेला पाहायला मिळाला. मात्र याच कोल्हापुरातील सिद्धनेर्ली या गावात गेल्या 17 वर्षांपासून मूर्तीदानाचा अभिनव उपक्रम राबवला जातोय. सिद्धनेर्ली परिसरातून तब्बल सतराशेच्या वर मूर्तींचे दान करण्यात आले. तर जवळपास 20 टन निर्माल्याची विल्हेवाट लावण्यात आली.
कोल्हापुरातील सिद्धनेर्ली गावात उमेश मगदूम यांच्या पुढाकाराने गेल्या कित्येक वर्षांपासून मूर्तीदानाचा अभिनव उपक्रम राबवण्यात येतो. आता हा फक्त उपक्रम राहिला नसून ती एक चळवळ बनली आहे. उमेश मगदूम हे सिद्धनेर्ली गावचे रहिवासी असून सध्या ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरवर्षी आपल्या कामातून वेळ काढत गावात गणेश मूर्ती दान आणि निर्माल्य दान उपक्रम ते राबवत आले आहेत.
advertisement
अशी सुरू झाली चळवळ
खरंतर 2006 सालापासून या मूर्तीदानाच्या या उपक्रमाला सुरुवात झाली होती. विज्ञान प्रबोधनी कोल्हापूरचे उदय गायकवाड यांच्या व्याख्यानातून तसेच कोल्हापूर शहरात पुरोगामी पर्यावरणवादी चळवळीतील लोकांच्या कामातून प्रभावित होवून मगदूम यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला शहीद भगतसिंग विचारमंच या माध्यमातून काम केले. तर 2013 सालापासून समाज विकास केंद्र संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका या नावाने विविध सामाजिक उपक्रम राबवल्याचे उमेश मगदूम यांनी सांगितले.
advertisement
यंदा का आहे मूर्तीदानाची गरज?
सध्या दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला होणाऱ्या पाणी योजनेला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. उमेश मगदूम हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपाययोजना करून नदी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत आहेत. त्यात पाऊस कमी झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदा गणेशमूर्ती नदीत किंवा विसर्जित न करता दान करणे गरजेचे बनले आहे, असेही मगदूम यांनी स्पष्ट केले.
advertisement
यावर्षीही मिळाला चांगला प्रतिसाद
2006 साली सुरुवातीलाच 385 मुर्ती आणि 2 टन निर्माल्य त्यांनी गोळा केले होते. यावर्षी सिद्धनेर्ली नदीकाठ, वंदूर धरण, नदी किनारा येथून 1000 गणेशमूर्ती आणि 15 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. बामणी येथून 350 मूर्ती आणि 4 टन निर्माल्य, तर एकोंडी येथून 350 मूर्ती आणि 4 टन निर्माल्य दान स्वरूपात मिळाले. नागरिकांनी विधिवत विसर्जीत केलेल्या मुर्ती एकत्र करुन मगदूम आणि त्यांचे सहकारी त्या मूर्ती गोळा करतात. पुढे ज्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही, अशा ठिकाणी पुन्हा मूर्ती विधिवत विसर्जीत केल्या जातात. त्यामुळे यंदा या सर्व गणेशमूर्ती एकोंडी येथील वैराट बंधूंच्या विहिरीत पुन्हा विधिवत विसर्जीत करण्यात आल्या.
advertisement
घरफाळ्यात 5 टक्के सूट
परिसरातील शाडूच्या मूर्तींची संख्या वाढविण्यासाठी तसेच लोकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी देखील प्रयत्न केले जातात. सिध्दनेर्ली येथील समाज विकास केंद्राच्या कार्यकर्त्यांनी शाडूच्या मुर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या नागरिकांना घरफाळा करात 5% सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. याला 14 ऑगस्टच्या ग्रामसभेत मान्यता देखील मिळालेली आहे.
advertisement
अजूनही अनेक कार्ये..
गेल्या 4 वर्षापासून निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या माध्यमातून गावात लोकसहभागतून हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केले जात आहे. त्यामुळे गाव हा पूर्णपणे हरित ग्राम झाल्याचे वाटते. तर यामुळेच सिद्धनेर्ली गावची झाडांचे गाव म्हणूनही एक ओळख निर्माण झालेली आहे.
यंदा उपक्रमाचे 18 वे वर्ष
समाज विकास केंद्र संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका आणि ग्रामपंचायत सिद्धनेर्ली यांनी मुर्तिदानाचा उपक्रम संयुक्तरित्या सुरू ठेवलेला असून यंदा उपक्रमाचे 18 वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धनेर्ली सोबतच एकोंडी ,बामणी या गावांचाही या उपक्रमात सहभाग होता. तर सामाजिक कामात कोणतेही गटतट मध्ये न आणता सर्व ग्रामस्थ सहभागी झाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पर्यावरणाच्या रक्षणासाठी गाव झालं एकत्र, 17 वर्षांपासून सुरूय मूर्तीदानाची चळवळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement