'सासरलाही लेक निघाली' ज्योतीला मिळालं हक्काचं नवं कुटुंब, कोल्हापुरात शाही विवाह सोहळा
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kolhapur Marriage: नुकताच कोल्हापुरात एक आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. बालकल्याण संकुलातील ज्योतीला नवं कुटुंब मिळालं.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर: स्थळ: मंगळवार पेठेतील बाल संकुल.. वेळ सायंकाळची.. सारा परिसर सजलेला.. दारात सडा रांगोळ्या रेखाटलेल्या.. मांडव उभारलेला.. हलगीच्या तालावर चिमुकल्यांचं बेभान नृत्य आणि उत्साहाला उधाण आलेलं.. घरचाच कार्यक्रम समजून कोल्हापुरातील प्रतिष्ठीत मंडळींची लगबग अशा उत्साही वातावरणात नुकतेच एक विवाह सोहळा संपन्न झाला. बालकल्याण संकुलातील लाडकी लेक ‘ज्योती’ ही रुकडी येथील मंदार संजय खटावकर यांच्याशी विवाहबद्ध झाली. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलामध्ये 73 वा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
advertisement
कोल्हापूर जिल्हा परिवेक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल संचलित कै. डॉ. अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृहातील ज्योतीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. डॉ. रागिणी आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी ज्योतीचे कन्यादान केले. ज्योती ही लहानपणापासूनच बालकल्याण संकुलात वाढली आहे. माहेर सोडून जाताना ज्योतीला अश्रू अनावर झाले होते.
advertisement
हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावचे मंदार संजय खटावकर आणि ज्योती यांच्या विवाह सोहळ्यासाठी बालकल्याण संकुलात जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले, सुरेश शिपुरकर, नंदिनी पटोडिया, एस. एन. पाटील, व्यंकाप्पा भोसले, शिरीष बेरी, मानसी बेरी, सी. डी. तेली यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
advertisement
विवाह सोहळ्यात यांनी वाढवली शोभा
हा विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी अनेकांनी माहेरची जबाबदारी निभावली व लाडक्या लेकीला निरोप दिला. मांडव आणि विद्युत रोषणाई नीलेश चव्हाण यांच्याकडून करण्यात आली, भास्कर भोसले यांच्यामार्फत स्टेज डेकोरेशन, स्वप्निल जठार - मंगळसूत्र, द्वारकादास श्यामकुमार कापड दुकान यांच्याकडून लग्न बस्ता, राजाराणी कपाट, श्री कन्स्ट्रक्शनचे एस. एन. पाटील यांनी कानातील टॉप्स तर एस. व्ही. ज्वेलर्स यांच्याकडून मनी मंगळसूत्र, नामदेवी अनिल कश्यप यांनी सागवानी बेड आणि आराम गादी कारखाना यांच्यामार्फत गादी सेट देण्यात आला.
advertisement
डॉ. प्रवीण आणि योगिता कोडोलीकर यांनी वॉशिंग मशीन, सचिन ग्लास ट्रेडर्स, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि रणरागिनी ग्रुप भांड्याचा सेट , भारती मुद्रणालय भांड्याचा सेट, किरण तिवले पूजेचे साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर गुरुप्रसाद सासमिले, ॲड. अश्विनी खाडे - बांगड्या, मेहंदी कोन, नेलपेंट, राजगोंडा शेटे - मंडप सजावट साहित्य, शा.कृ.पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट - वधू-वर कपडे, अनुराधा पित्रे (मेकअप साहाय्य), नयना खत्री (पेढे), सोनाली निकम (प्रवासी बॅग, ड्रेस, पर्स), हरिप्रिया बॅग हाऊस व रूपाली फाटक (प्रवासी बॅग, बाऊल सेट), कुमार तोडकर (गजरे), नूपुर फुटवेअर (चप्पल), पुष्पक लेडीज वेअर, मोहिनी तोरस्कर व रेवती परब (कपडे), शिल्पा शहाजीराजे भोसले (पंजाबी ड्रेस), अविनाश भाले (स्वेटर, ब्लँकेट) यांनी नवदाम्पत्याला माहेरची भेट दिली.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Dec 27, 2024 1:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
'सासरलाही लेक निघाली' ज्योतीला मिळालं हक्काचं नवं कुटुंब, कोल्हापुरात शाही विवाह सोहळा








