कोल्हापुरात पावसाची विश्रांती, महापूर ओसरतोय; पण आता उभं ठाकलंय नवं संकट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
कोल्हापूर शहर आणि ग्रामीण परिसरात पावसाने आता उसंत घेतल्याने पुराची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागात साचलेले पाणी आता ओसरू लागले आहे.
साईप्रसाद महेंद्रकर/ प्रतिनिधी
कोल्हापूर : महापुराचा जबरदस्त फटका बसलेल्या कोल्हापूरकरांना आता दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या वर 47 फुटांवर वाहत आहे. पावसाने आता उसंत घेतल्याने शहर आणि ग्रामीण परिसरात पुराची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागात साचलेले पाणी आता ओसरू लागले आहे. परंतु, ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे तिथे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
advertisement
राधानगरी धरणाचे दरवाजे होतील बंद
31 जुलै पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असल्यामुळे पावसाने थोडीशी उघडीप घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून राधानगरी धरणाचे फक्त 2 स्वयंचलित दरवाजे सध्या उघडलेले आहेत. पण सध्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे हे दोन्ही दरवाजे देखील येत्या काळात बंद होतील अशी शक्यता आहे.
advertisement
सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य
पुराचे पाणी शहरी भागात जास्त सखल परिसरात साचले होते. तेथून ते ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरी भागात पूर परिस्थिती सुधारू लागली आहे. मात्र पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या प्लास्टिकच्या अनेक वस्तू आणि कचऱ्यामुळे शहरात बऱ्याच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. तर साचून राहिलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी देखील येऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना आता या त्रासाचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
बालिंगा परिसरात अजूनही मदतकार्य सुरू
कोल्हापूर गगनबावडा हायवे वर बालिंगा पूलानजीक पाणी आल्यामुळे हा रस्ता सध्या बंद आहे. मात्र ग्रामस्थांना शहराशी जोडण्याचे काम कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अर्थात केडीआरएफ इतर काही संस्थांच्या मदतीने करत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये कित्येक रुग्णांना बोटीतून सोडण्याचे, मृतदेह गावाकडून शहरी भागात किंवा शहरी भागातून गावाकडे सोडण्याचे काम सुरू आहे. समाजसेवेखातर अविरतपणे हे काम सुरू असून अद्याप रस्त्यावरील पाणी पूर्णपणे कमी न झाल्यामुळे पुढे हे काम अजून सुरू राहणार असल्याचे चंद्रकांत डोंगळे यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान. 28 जुलै संध्याकाळी सहा वाजता पंचगंगा नदीचे पाणी पातळी हे राजाराम बंधारा या ठिकाणी 47 फूट 02 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे धोका पातळीच्याही पाच फूट वर नदीची पाणी पातळी असून अगदी संथ गतीने पाणी पातळीत घट होत आहे. दरम्यान, येत्या काळात पावसाचा जोर अगदी कमीच राहिला तर पूर परिस्थिती लवकर संपुष्टात येऊ शकते.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 28, 2024 11:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरात पावसाची विश्रांती, महापूर ओसरतोय; पण आता उभं ठाकलंय नवं संकट