कोल्हापुरातून 'या' एकमेव व्यक्तीची होती भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावर स्वाक्षरी, इतिहास तुम्हाला माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील ते असे एकमेव व्यक्ती होते, ज्यांना भारतीय राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करण्याचा बहुमान मिळाला होता. मात्र याबाबत आजकालच्या तरुणवर्गात कित्येकांना कल्पना देखील नाही आहे.
कोल्हापूर, 23 डिसेंबर : थोर स्वातंत्र्यसैनिक, पद्मश्री या सोबतच सहकारमहर्षी अशी ओळख असणारे देशभक्त रत्नाप्पा कुंभार हे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव मानले जाते. कोल्हापुरातील विशेषतः शिरोळ, हातकणंगले भागातील औद्योगिक आणि शेतीविषयक भरीव विकासात रत्नाप्पा कुंभार यांचे खूप मोठे योगदान होते. तर पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील ते असे एकमेव व्यक्ती होते, ज्यांना भारतीय राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करण्याचा बहुमान मिळाला होता. मात्र याबाबत आजकालच्या तरुणवर्गात कित्येकांना कल्पना देखील नाही आहे.
कोण होते रत्नाप्पा कुंभार?
रत्नाप्पा कुंभार हे कोल्हापूरच्या भरमाप्पा आणि गंगूबाई कुंभार यांचे सुपुत्र होते. कोल्हापूर जिल्ह्यातील निनशिरगाव या छोट्याशा खेडेगावात 15 सप्टेंबर 1909 रोजी रत्नाप्पांचा जन्म झाला. अगदी सामान्य मुलाप्रमाणे माध्यमिक, मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांसाठी उभारलेल्या वसतिगृहात राहून त्यांनी राजाराम महाविद्यालयात 1933 साली बीएची पदवी मिळवली होती. त्यानंतर कायद्याच्या शिक्षणासाठी एलएलबी मध्येही प्रवेश घेतला होता. मात्र आजूबाजूच्या वातावरणात त्यांचे मन परावर्तित झाले अन् त्यांनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडूनच लोकहिताच्या चळवळीत सहभागी होऊ लागले.
advertisement
राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी भरीव कामगिरी केली आहे. स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्याचे काम सुरू असताना घटना समिती स्थापण्यात आली होती. त्या समितीचे सदस्य म्हणून रत्नाप्पा कुंभार यांनी कार्य केले आहे. 11 महिने जे कामकाज सुरू होते, त्यामध्ये पूर्णपणे सक्रिय रीतीने ते सहभागी होते. ज्यावेळी राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार झाला, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह त्या मसुद्यावर सही करणारे रत्नाप्पा कुंभार हे कोल्हापूर संस्थानातील एकमेव व्यक्ती होते. त्यावेळी सध्याच्या महाराष्ट्र राज्य हद्दीत काही ठराविकच संस्थाने शिल्लक होती. आजही त्यांचा फोटो राज्यसभेत आणि लोकसभेत पाहायला मिळतो, अशी माहिती कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली आहे.
advertisement
रत्नाप्पा कुंभार यांचा सहभाग हा इतर अनेक क्षेत्रातही होता. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्यही मोठे आहे. कोल्हापुरात पूर्वी एक ब्रिटिश कालीन कायदा महाविद्यालय सुरू होते. साईक्स लॉ कॉलेज या नावाने ओळखले जाणारे हे कॉलेज 1933 साली स्थापन झाले होते. मात्र भारतीय संविधान अमलात आणल्यानंतर 1951 साली हे कॉलेज बंद पडत होते. तेव्हा रत्नाप्पा कुंभार यांनी ते कॉलेज स्वतः चालवायला घेऊन 1993 पर्यंत स्वखर्चाने चालवले. रत्नाप्पा कुंभार यांनी अंसील ऑफ एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आज शहजी लॉ कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर हे तीन कॉलेज चालवले जातात. याव्यतरिक्त साखर कारखाने उभारून सहकार क्षेत्रात देखील प्रचंड कार्य रत्नाप्पा कुंभार यांनी केले आहे, असेही डॉ. प्रवीण पाटील यांनी सांगितले आहे.
advertisement
करिअरला मिळेल नवा आयाम; कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शिका आता पोर्तुगीज भाषा
दरम्यान राज्यघटना अंतिम मसुद्यावर सही करणारे व्यक्ती, पहिल्या लोकसभेचे खासदार, 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री राहिलेल्या रत्नाप्पा कुंभार यांना पद्मश्री पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. तर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट. ही पदवी देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते. तर वयाच्या 86 व्या वर्षी 23 डिसेंबर 1998 साली निधन झाले. अशा या थोर स्वातंत्र्यसैनिक देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
December 23, 2023 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरातून 'या' एकमेव व्यक्तीची होती भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावर स्वाक्षरी, इतिहास तुम्हाला माहितीये का?