टाकाऊ चहापूड बदलेल तुमचं नशीब, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रोज चहा बनवल्यानंतर चहापूड टाकून दिली जाते. मात्र शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनामुळे टाकाऊ चहापूड आता लखपती बनवणार आहे.
कोल्हापूर, 21 सप्टेंबर: आपण सर्वजण रोजच चहा पितो चहा पिऊन झाल्यानंतर त्याची चहापूड कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. मात्र या चहापुडीचा देखील पुनर्वापर करता येतो आणि त्यापासून झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असे घटक बनवता येतात, असा विचार कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील संशोधकांच्या डोक्यात आला. त्यातूनच सुरू केलेल्या संशोधनाला आता यश आले आहे. टाकाऊ चहापूडपासून कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल या संशोधकांनी तयार केले आहे. नुकतेच त्याचे पेटंटही त्यांना मिळालंय. या संशोधनाचा उपयोग शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ वरिष्ठ प्रा. डॉ. जी. बी कोळेकर आणि डॉ. रविंद्र वाघमारे यांनी हे संशोधन केले आहे. तर 2017 सालापासून ते यावर संशोधन करत आहेत. नुकतेच त्यांच्या या संशोधनासाठी त्यांनी भारतीय पेटंट मिळवले आहे. विद्यापीठातील प्रयोगशाळेबरोबरच या संशोधनाच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतातही घेण्यात आल्या आहेत, असे प्राध्यापक डॉ. जी. बी कोळेकर यांनी सांगितले.
advertisement
संशोधनाच्या संदर्भात कसे सुचले ?
खरंतर रसायनशास्त्रज्ञ कोळेकर यांनी शेतातील रासायनिक खतांच्या वापराने होणाऱ्या दुष्परिणामांचे निरीक्षण केले. बरेचसे शेतकरी आपल्या शेतातील पिकाची वाढ जोमाने व्हावी, यासाठी रासायनिक खतांचा अमाप वापर करत असतात. याचाच परिणाम शेतातील नैसर्गिक घटकांवर आणि मानवी आरोग्यावर देखील होताना पाहायला मिळतो. यामुळे कित्येकांना कॅन्सर सारख्या रोगांचा सामनाही करावा लागतोय. त्यामुळेच आपण यावर काय करू शकतो, असा विचार कोळेकर यांच्या डोक्यात सारखा येत होता. तसेच डॉ. रविंद्र वाघमारे हे कृषी रसायने आणि कीटक व्यवस्थापन विषयात काम करतात. त्यामुळे त्यांना शेतीशी संबंधित या विषयावर संशोधनाचा हा विषय दिला होता. त्यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे डॉ. कोळेकर यांनी सांगितले.
advertisement
हा होता संशोधनाचा हेतू
खरंतर प्रत्येक संशोधन हे एखाद्या हेतूला धरूनच केले जाते. अगदी तसेच डॉ कोळेकर आणि डॉ वाघमारे या संशोधकांनी शेतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला. कोल्हापुरातील कित्येक भागांमध्ये वाढणारे कॅन्सरचे पेशंट लक्षात घेता त्यांनी हे ध्येय ठरवले होते.
advertisement
नेमके काय आहे संशोधन?
स्वयंपाक घरात रोज चहा बनवल्यानंतर टाकून देण्यात येत असलेल्या चहापुडीचे हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या टाकाऊ चहापूडपासून कार्बन डॉट नॅनो मटेरियल तयार केले आहे. याची द्रव स्वरूपात शेतातील पिकांवर फवारणी केल्यानंतर पिकांची वाढ अगदी जोमाने होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या यांच्यावर ही फवारणी करता येते. तर हे संशोधन पूर्णपणे पर्यावरण पूरक आणि कमी खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्याला देखील याचा फायदाच होणार आहे. या मध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे जिरायती शेतीसाठी देखील अधिक प्रमाणात उपयुक्त ठरू शकते, असेही डॉ कोळेकर यांनी स्पष्ट केले.
advertisement
दरम्यान, शेतीतील उत्पन्न वाढीसाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असून याचा फायदा कित्येक शेतकऱ्यांना होणार आहे. तर या संशोधनामुळे शिवाजी विद्यापीठाचे नाव अजूनच उंचावले गेले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 21, 2023 12:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
टाकाऊ चहापूड बदलेल तुमचं नशीब, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट