गणपती बाप्पाला बांधा कोल्हापुरी फेटा, पाहा सोपी पद्धत
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
यंदा गणेशोत्सवात फेटेवाल्या गणरायाचा ट्रेंड आहे. आपणही आपल्या बाप्पाला घरीच कोल्हापुरी फेटा बांधू शकता.
कोल्हापूर, 19 सप्टेंबर : यंदा कापडी फेटे आणि धोतर नेसवलेल्या गणेश मूर्तींचा ट्रेंड बाजारात पाहायला मिळतोय. त्यामुळे बरेच जण आपल्या बाप्पाला एक तर तयार फेटा, धोतर विकत घेत आहेत किंवा कुंभाराकडूनच गणेश मूर्तीला धोतर-फेटा नेसवून देण्याची विनंती करत आहेत. त्यामुळेच कोल्हापुरातील एक तरुण गणपती बाप्पाला कापडी धोतर नेसवण्याचे आणि अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे फेटे बांधण्याचे काम करत आहे. गणपती बाप्पाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने धोतर आणि फेटा कसे नेसवावे, याबद्दल अशांत मोरे याने सांगितले आहे.
खरंतर घरगुती आणि छोट्या गणेशमूर्तींना धोतर फेटे नेसवणे ही एक कलाच आहे. जी प्रत्येकाला जमेलच अशी नाही. मात्र वर्षातून एकदा आपल्या घरी येणाऱ्या बाप्पांची सेवा करताना बरेच जण नवनवीन गोष्टी करण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते अशा पद्धतीने प्रयत्न करून गणेशमूर्तीला खरे फेटे देखील बांधू शकता, असे अशांत सांगतो. अशांत हा एक मायक्रो आर्टिस्ट असून कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरातील रहिवासी आहे. त्याने आजवर खडूवर, तीळावर, तांदळावर अनेक प्रतिकृती साकारत अनोखी कला जोपासली आहे.
advertisement
गणेश मूर्तीला फेटा जर घालायचा असेल तर एकतर तयार फेटे विकत घेऊन ते कोणत्याही मूर्तीला आपण घालू शकतो. पण असे फेटे दिसायला जास्त आकर्षक नसतात किंवा आपल्या गणेश मूर्तीवर व्यवस्थितरित्या बसतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्य वापरून आपण मस्त फेटा गणपतीला नेसवू शकतो. आपआपल्या परीने कलात्मक पद्धतीने आपण डोक्यावरील फेटा सजवू शकतो, असे अशांतने सांगितले.
advertisement
कसा बांधावा गणपतीला फेटा?
- फेटा बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये एका साडीचा एक मोठा तुकडा, त्याच साडीचे कापून घेतलेल्या काठाचा तुकडा, फेट्याच्या तुऱ्यासाठी 28 इंचाचा एक काठाचा तुकडा, साडीच्या पदराचा एक तुकडा असे 4 लहान मोठे साडीचे तुकडे लागतात.
- त्याचबरोबर फेटा गणेशमूर्तीला चिटकवण्यासाठी स्टेप्लर, हॉट ग्लू गन, अधेसीव्ह बाँड यापैकी आपल्याला योग्य वाटेल असे काहीही वापरु शकतो.
- सुरुवातीला फेट्याच्या तुरा तयार करून घ्यायचा. त्यासाठी 28 इंचाचा काठ घेऊन त्याला मागे कागद चिकटवून घ्यावा.
- आपण कागदी फॅन बनवतो त्याप्रमाणे तुरा बनवून घेऊन त्याच्या एका टोकाला रबर लावून ठेवायचे.
- पुढे काठाच्या दुसऱ्या तुकड्याला देखील मागे कागद लावून ठेवायचे.
- गणेशमूर्तीला फेटा नेसवायला सुरुवात करताना पाहिला काठाचा छोटा तुकडा गणेशमूर्तीच्या डोक्यावर फेट्याची दिसणारी खालची बाजू म्हणून पेस्टींग करून घ्यावे.
- त्यानंतर साडीचा मोठा तुकडा घेऊन तो पिळ मारून घ्यावा. आणि त्याचे एक टोक गणेशमूर्तीच्या डाव्या बाजूला चिकटवून घ्यावे. पुढे पिळ मारतच गणेशमूर्तीच्या डोक्याभोवती चेहऱ्याच्या अंदाजाने 3 किंवा 4 फेरे करून शेवटी राहिलेले कापड कापून टाकायचे आणि दुसरे टोक देखील पेस्टींग करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर 8 ते 9 इंचाचा दुसरा काठ घेऊन त्यालाही मागे कागद लावून घ्यावा. तो तुकडा तुऱ्याचा बाजूचा तिरका भाग म्हणून अंदाजाने पेस्टींग करून घ्यावा. तेच कापड डोक्याभोवती फिरवून घेऊन फेट्याचा आकार द्यावा. कापड कानावरुन घेताना थोडे कापावे सर्व ठिकाणी व्यवस्थित पेस्टींग करून घ्यावे.
- पुढे फेट्याचे शेवटचे टोक दाखवण्यासाठी पदराचा घेतलेला भाग घडी करून नीट पेस्टींग करून घ्यावा.
- त्यानंतर तुरा खोवून घेऊन पेस्टींग करावा.
- पुढे मुकुटाच्या शिल्लक जागेत कागद भरून त्यावर एक छोटे कापड पेस्टींग करून घ्यावे. जेणेकरून फेटा भरीव दिसतो.
advertisement
दरम्यान, हा फेटा पेस्टींग केला असल्यामुळे मूर्ती ही कापडासोबतच विसर्जित करावी लागते, असे देखील अशांत याने स्पष्ट केले आहे.
Location :
First Published :
September 19, 2023 10:18 AM IST