भटक्या कुत्र्यांना आता पोटभर जेवण मिळणार! तरुणांनी शोधली भन्नाट कल्पना
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
कुत्री सहसा येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करत नाहीत. मात्र भूकेपोटी ती हिंसक होऊ शकतात. याच विचारातून ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : प्राणी आणि मानवातलं प्रेम काही नवं नाही. एखाद्या प्राण्यासोबत आपण काही दिवस राहिलो तरी आपल्याला त्याचा लळा लागतो. याच प्रेमापोटी लोक आजकाल आपल्या प्राण्यांचे वाढदिवस साजरे करतात. काही ठिकाणी अगदी डोहाळे जेवणही साजरं केलं जातं. परंतु हे लाड केवळ पाळीव प्राण्यांच्या बाबतीतच पाहायला मिळतात. रस्त्यावर अन्नपदार्थांसाठी वणवण फिरणाऱ्या भटक्या प्राण्यांचे मात्र हाल होतात. रस्त्यावरील कुत्र्यांच्या पाठीवर मायेनं हात फिरवून त्यांना खाद्यपदार्थ देणारे फार कमी लोक असतात. परंतु इतर कुत्र्यांना मात्र कुठंतरी काहीतरी मिळेल या आशेवरच जगावं लागतं. यावर आता कोल्हापुरातील एका संस्थेनं नामी उपाय शोधलाय.
advertisement
कोल्हापूर शहरात मागील काही महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सामान्य नागरिकांना होणारा त्रास वाढल्याचं पाहायला मिळत होतं. यात बऱ्याचदा कुत्री हिंसक झाल्याच्या घटनाही घडल्या. कित्येक भटक्या कुत्र्यांना व्यवस्थित खायला मिळत नाही आणि भुकेनंच ते हिंसक होतात, याच विचारातून कोल्हापूरच्या डीएम फाउंडेशननं शहरात डॉग फीडर ही संकल्पना राबवली आहे. याद्वारे भटक्या कुत्र्यांना आता वेळेवर आणि पोटभर खायला मिळेल.
advertisement
कोल्हापूरच्या जवाहर नगर परिसरातील रहिवासी दानिश अस्लम मणेर या तरुणानं आपल्या डीएम फाउंडेशनकडून भटक्या कुत्र्यांसाठी ही नवी संकल्पना राबवली आहे. कुत्री सहसा येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करत नाहीत. मात्र भूकेपोटी ती हिंसक होऊ शकतात. चौका-चौकात कुत्र्यांसाठी खायला अन्न ठेवणं अशी संकल्पना केरळमध्ये पाहिली होती, त्यावरूनच डॉग फीडरची व्यवस्था कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं दानिश यांनी सांगितलं.
advertisement
नेमकी काय आहे ही संकल्पना?
डॉग फीडर या संकल्पनेनुसार, भटक्या कुत्र्यांना अन्नपदार्थांसाठी वणवण फिरावं लागणार नाही, तर त्यांना सहज खायला मिळू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय त्यांना अन्नपदार्थ व्यवस्थित खाता येतील अशा मोठ्या पाईपच्या तुकड्याचा वापर करण्यात आला आहे. या 2 फुटांच्या पीव्हीसी पाईपमध्ये कुत्र्यांसाठी डॉग फूड किंवा अन्य पदार्थ ठेवले जातील. पीव्हीसी पाईपचं खालचं तोंड कुत्र्यांना सहज खाता यावं यासाठी उघडं असेल. त्यामुळे भुकेलेली कुत्री या डॉग फीडरजवळ जाऊन जेवढी भूक असेल तेवढं खाऊ शकतील, असं दानिश यांनी सांगितलं.
advertisement
कसं केलं जातं व्यवस्थापन?
कोल्हापूर शहरात सम्राट नगर, प्रतिभा नगर, ताराबाई पार्क, तलवार चौक, दसरा चौक, संभाजीनगर, नागाळा पार्क, शेंडा पार्क, आर. के. नगर, सायबर चौक, नेहरूनगर, इत्यादींसह 15 ठिकाणी सध्या असे डॉग फीडर बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे भटक्या कुत्र्यांना खायला देण्याची जबाबदारी त्या डॉग फीडरच्या आसपास राहणाऱ्या सदस्यांवर सोपवण्यात आली आहे. यामधून डॉग फूड, बिस्कीट किंवा कोरडे खाद्यपदार्थ कुत्र्यांना मिळतील, असं दानिश यांनी सांगितलं.
advertisement
या डॉग फीडरची संख्या वाढवण्याचा आणि प्राण्यांसाठी आणखी काही नवे उपक्रम राबवण्याचा विचार आहे. येत्या काळात लवकरात लवकर असे उपक्रम राबवू, असं दानिश म्हणाले. दरम्यान, दानिश यांनी आपल्या 5 ते 6 मित्रांना सोबत घेऊन साधारण 2018 सालच्या उत्तरार्धात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. कोल्हापुरात 2019 साली आलेल्या पुरावेळी त्यांनी गरजू व्यक्तींना मदत केली. त्यावेळी ते नाश्ता वाटप करायचे, पुढे एका संस्थेमार्फत हेच कार्य सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हापासून डीएम फाउंडेशन या नावानं ते दर आठवड्याला 150 ते 200 जणांना आठवड्यातून 3 वेळा जेवण देतात. तसंच पावसाळ्यात छत्री वाटप, थंडीच्या दिवसांमध्ये ब्लॅंकेट वाटपदेखील या संस्थेकडून केलं जातं. विशेष म्हणजे हे सर्व कार्य ते स्वखर्चातून करत आले आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 28, 2024 8:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
भटक्या कुत्र्यांना आता पोटभर जेवण मिळणार! तरुणांनी शोधली भन्नाट कल्पना