प्रज्ञा सातव यांना राजीनामा देण्यासाठी दबाव होता का? विधान परिषदेत जोरदार राडा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Budget Session Pradnya Satav Resign: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारले.
मुंबई : काँग्रेसने संधी दिलेल्या सदस्यत्वाचा कार्यकाळ अजून तीन वर्षे बाकी असतानाही प्रज्ञा राजीव सातव यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सदस्यत्वाचा कार्यकाळ बाकी असतानाही त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. याच राजीनाम्याविषयी सभापती राम शिंदे यांनी सभागृहाला अवगत केल्यानंतर विधान परिषदेत काही वेळ राडा पाहायला मिळाला. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सभापती राम शिंदे यांना प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावरून प्रश्न विचारले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारले. त्यावर वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचे सांगत अधिक माहितीसाठी आपण मला खासगीत भेटू शकता, असे हसत हसत सभापती राम शिंदे सतेज पाटील यांना उद्देशून म्हणाले.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेता पद कुणाला मिळू नये, म्हणून प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला?
advertisement
प्रज्ञा सातव यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता का? त्यांनी राजीनामा देण्याचे कारण काय? विधान परिषदेत विरोधी पक्षनेता पद कुणाला मिळू नये, म्हणून त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले का? असे प्रश्न सतेज पाटील यांनी विचारले. सतेज पाटील यांच्या सुरात शशिकांत शिंदे यांनीही सूर मिसळले. विरोधी पक्षाने घेतलेल्या हरकतीवर राम शिंदे यांनी आक्षेप घेतला. राजीनाम्याच्या अडीच महिन्यांनंतर तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही, असे सभापती राम शिंदे म्हणाले.
advertisement
माझ्या अधिकार कार्यकक्षेत राजीनामा स्वीकारला
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आलेल्या सदस्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागेचा माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे, असे राम शिंदे यांनी सभागृहाला सांगितले.
सभापती हसत हसत म्हणाले, खासगीत येऊन भेटा, राजीनाम्यासंबंधी अधिक माहिती देतो
advertisement
विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला, असे राम शिंदे यांनी सांगितले. परंतु तरीही विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर खासगीत येऊन भेटल्यावर राजीनाम्यासंबंधी अधिक माहिती देतो, असे राम शिंदे स्मितहास्य करीत म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 2:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रज्ञा सातव यांना राजीनामा देण्यासाठी दबाव होता का? विधान परिषदेत जोरदार राडा








