Maharashtra Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? महायुतीच्या मंत्र्यांच्या नावावर दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळातील नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील महायुतीचे नेते फक्त चर्चा करणार आहेत.
मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्ता मिळाल्यानंतर जवळपास 13 दिवसांनी सत्ता स्थापन झाली. आता, मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असताना दुसरीकडे विस्तार लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील महायुतीचे नेते फक्त चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची चर्चा रंगली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले आहे. त्यामुळे आता इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतिक्षा सहन करावी लागणार आहे.
advertisement
महायुतीच्या नेत्यांमध्ये होणार नावांवर चर्चा, दिल्लीतून शिक्कामोर्तब...
महायुतीमधील भाजप, शिवसेना-शिंदे आणि राष्ट्रवादी-अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये मुंबईत चर्चा होणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते आपआपल्या संभाव्य मंत्र्यांची नावे सादर करून चर्चा करतील. त्यानंतर दिल्लीत या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. या सगळ्या प्रक्रियेत काहीसा उशीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपकडून शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आले होते. 'मिस्टर क्लीन' असलेल्या आमदारांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेतील काहींना नारळ मिळण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपच आमचे मंत्री कसे ठरवणार असा संतप्त सवाल शिंवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला होता.
advertisement
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन साधारणपणे 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूतोवाच केले होते. तर, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही दिवशी शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. विधानसभेचे अधिवेशन 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर एक दिवस मध्ये जाऊन लगेच 11 तारखेला विस्तार करणे शक्य नसेल. मुख्यमंत्री फडणवीस हे 12 डिसेंबरला दिवसभर नागपुरात असतील. त्यामुळेच 14 तारखेला मुंबईत किंवा तेही शक्य झाले नाही तर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला नागपुरात नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
कोणाच्या वाटेला किती मंत्रिपदे?
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला 22, शिवसेना शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार नाही, याबाबत तिन्ही पक्षांमध्ये सध्य एकमत आहे. मात्र, एक-दोन विधान परिषद सदस्यांबाबत अपवाद केला जाऊ शकतो. जुन्या मंत्र्यांपैकी एका-दोघांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2024 10:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? महायुतीच्या मंत्र्यांच्या नावावर दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब