फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 10,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
- Published by:Kranti Kanetkar
- press trust of india
Last Updated:
लहान प्रवासासाठी चारचाकीऐवजी ई-बाइकचा वापर केल्याने ट्रॅफिक कमी होईल आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.
मुंबई : वाढत्या ट्रॅफिक आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय निःसंशय मोठ्या प्रमाणावर लोकांना सोयीचा आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू झाल्यास 15 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना स्वस्त आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात ही सेवा प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे. लहान प्रवासासाठी चारचाकीऐवजी ई-बाइकचा वापर केल्याने ट्रॅफिक कमी होईल आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.
10,000 पेक्षा जास्त रोजगार संधी
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या नव्या सेवेच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) 10,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. राज्याच्या इतर भागांमध्येही तेवढ्याच संधी निर्माण होतील. यामुळे रोजगाराच्या संधींसोबतच तरुणांना स्टार्टअप किंवा स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळेल. सरकारने या सेवेसाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. ई-बाइकवर प्रवाशांना सुरक्षित बसता यावे यासाठी मागे बसण्यासाठी योग्य सोय आणि पावसाळ्यात छताची सोय असलेली वाहने वापरण्यावर भर दिला जाणार आहे.
advertisement
परवडणाऱ्या दरात प्रवास
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांना जास्त खर्च टाळता यावा यासाठी भाड्यांचे नियमन सरकार करणार आहे. “जर एखाद्या प्रवाशाला सध्या एका प्रवासासाठी 100 रुपये मोजावे लागत असतील, तर ई-बाइक टॅक्सीच्या माध्यमातून तेच अंतर ३०-४० रुपयांत पार करता येईल. हा निर्णय नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा देईल.” सरकारच्या या योजनेत ऑटो-रिक्शा आणि टॅक्सीचालकांच्या मुलांना ई-बाइक टॅक्सी चालवण्यासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांना 10,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल, आणि उर्वरित रक्कम त्यांनी कर्जाच्या माध्यमातून उभारता येईल. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा मार्ग मोकळा होईल.
advertisement
‘ग्रीन महाराष्ट्र’च्या दिशेने मोठे पाऊल
ही योजना केवळ प्रवासी सेवेसाठीच नव्हे, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने प्रदूषण मुक्त महाराष्ट्र संकल्पना पुढे रेटण्यासाठी हा निर्णय घेतला असून ई-बाइकच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल. इंधनावर अवलंबून असलेली वाहतूक यंत्रणा जसजशी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळेल, तसतशी प्रदूषण समस्या कमी होईल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक विशेष कार्यगट स्थापन केला आहे.
advertisement
सध्या महसूल मॉडेल तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ते निश्चित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर ती प्रवाशांसाठी किती उपयुक्त ठरेल आणि त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर किती सकारात्मक परिणाम होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मात्र, या निर्णयामुळे महाराष्ट्रात वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार, हे निश्चित!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 02, 2025 11:46 AM IST