शी शी शी... नितेश राणेंना पाहून आदित्य ठाकरे यांनी तोंड फिरवलं, भास्कररावांचा हात पकडून घेऊन गेले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Aaditya Thackeray vs Nitesh Rane: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आदित्य ठाकरे माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी आले असताना त्यांना माध्यम कक्षात नितेश राणे दिसले.
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात वारंवार होणारे शाब्दिक युद्ध, आरोप प्रत्यारोप संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन नितेश राणे सातत्याने आरोप करतात. चौकशी यंत्रणांनी आदित्य ठाकरे यांना क्लिनचिट देऊनही नितेश राणे वारंवार लक्ष्य करताना दिसतात. कधी जाहीर सभांमधून, कधी विधिमंडळाच्या अधिवेशनातून तर कधी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नितेश राणे हे आदित्य ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले करतात. कधी आदित्य ठाकरे उत्तर देतात तर कधी अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करतात. आजही असाच प्रत्यय विधिमंडळाच्या आवारात आला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसऱ्या आठवड्यातील आज (मंगळवार) दुसरा दिवस आहे. आमदार, मंत्री महोदय माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यम कक्षात येत असतात. आदित्य ठाकरेही प्रतिक्रिया देण्यासाठी आले असताना त्यांना नितेश राणे दिसले.
माध्यम कक्षासमोर नेमके काय घडले?
भास्कर जाधव यांच्याबरोबर आदित्य ठाकरे हे माध्यम कक्षात येत होते. त्यावेळी तेथे माध्यम प्रतिनिधींची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बरीच गर्दी होती. गर्दी पाहून आदित्य ठाकरे यांनी तिकडे कोण आहे? असे सोबतीच्या सहकाऱ्यांना विचारले. त्यावर एकाने नितेश राणे असे उत्तर दिले. नितेश राणे यांचे नाव ऐकताच आदित्य ठाकरे यांनी युटर्न घेतला. शी शी शी... म्हणत सोबतच्या भास्कर जाधव यांचा हात पकडून माघारी चला, असे आदित्य ठाकरे यांनी सूचित केले. तसेच कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणताच सगळे हसायला लागले. भास्कर जाधव यांनीही आदित्य ठाकरे यांच्याबरोबर तेथून जाणे पसंत केले.
advertisement
राणे पिता पुत्राच्या कोणत्याही प्रश्नावर किंवा आरोपावर आम्ही उत्तर देणार नाही, असा पवित्रा मध्यंतरी ठाकरे कुटुंबाने घेतला होता. ठाकरे पिता पुत्रांनी सभा संमेलनातून सरकारवर टीका केली की राणे कुटुंब त्यांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देतात. एकेरी हल्ले करून ठाकरेंवर टीकेची राळ उडवतात. अगदी वैयक्तिक हल्लेही केले जातात. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही टीकेला किंवा आरोपाला उत्तर न देण्याची भूमिका ठाकरे कुटुंबाने घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शी शी शी... नितेश राणेंना पाहून आदित्य ठाकरे यांनी तोंड फिरवलं, भास्कररावांचा हात पकडून घेऊन गेले