जवळच्या कार्यकर्त्यानेच घेतली मनोज जरांगेंची सुपारी? हत्येच्या कटातील आरोपींचे फोटो समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुरुवारी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आता दोन्ही आरोपींचे फोटो समोर आले आहेत.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुरुवारी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचा आरोप स्वत: जरांगे यांनी केला. ही सुपारी दुसरी तिसरी कुणी नव्हे तर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच दिल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला. धनंजय मुंडेंचा कथित पीए कांचन पाटील सातत्याने आरोपींच्या संपर्कात होता, असंही जरांगे यांनी म्हटलं.
मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडेंवर विविध आरोप होत आहेत. या सगळ्यांवर आता धनंजय मुंडे काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात आता मनोज जरांगे यांची सुपारी घेणारे कथित सुपारीबाज नक्की कोण आहेत? याची माहिती समोर आली असून त्यांचे फोटोही समोर आले आहेत.
advertisement
मनोज जरांगे यांची सुपारी घेतल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर घातपात रचल्याचे आरोप आहेत. संशयित आरोपी अमोल खुणे, दादा गरुड यांच्यासह इतर सहकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज जरांगे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट प्रथमदर्शनी दिसून आल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे.
advertisement
आता आरोपींची फोटो समोर आले असून यातील एका आरोपीचा फोटो थेट मनोज जरांगे यांच्यसोबतच असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जरांगेंची सुपारी घेणारे हे कथित आरोपी हे मनोज जरांगे यांची माजी कार्यकर्ते असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सध्या जालना पोलीस करत आहेत. मात्र जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याने हे प्रकरण आणखी तापताना दिसत आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 07, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जवळच्या कार्यकर्त्यानेच घेतली मनोज जरांगेंची सुपारी? हत्येच्या कटातील आरोपींचे फोटो समोर


