विनासोडत घरांना पाच वर्षांची.., म्हाडाने घेतला मोठा निर्णय! तुमच्यावर काय परिणाम होणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mhada Home : ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत घरांसाठी संगणकीय पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुक नागरिकांना सोडतीशिवाय थेट घर मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मुंबई : शहरातील गृहनिर्माण बाजारपेठेत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या मुंबई मंडळाने विक्रीविना रिक्त राहिलेली तब्बल ११८ घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत घरांसाठी संगणकीय पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुक नागरिकांना सोडतीशिवाय थेट घर मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मुंबई मंडळाच्या पारंपरिक सोडतीला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र कोट्यवधी रुपये किमतीची उच्च दराची घरे अपेक्षेप्रमाणे विकली जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर घरे रिक्त राहिली होती. ही घरे नागरिकांना उपलब्ध व्हावीत आणि साठा कमी व्हावा, या उद्देशाने ‘प्रथम प्राधान्य’ योजनेचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईत पहिल्यांदाच या योजनेअंतर्गत ११८ घरांची विक्री केली जाणार आहे.
advertisement
अटी शिथिल, पण काही बंधने कायम
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत म्हाडाच्या पारंपरिक सोडतीतील बहुतांश पात्रता अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. मात्र मुंबई मंडळाने काही महत्त्वाच्या अटी कायम ठेवल्या आहेत. त्यामध्ये अधिवास दाखला (डोमिसाइल) बंधनकारक असणे आणि घर मिळाल्यानंतर पाच वर्षे ते विकता येणार नाही, ही अट महत्त्वाची आहे.
advertisement
घर मिळाल्यानंतर पाच वर्षांच्या आत विक्री केल्यास कठोर कारवाईची तरतूद असून, प्रसंगी घर जप्त होण्याचीही शक्यता आहे. अनेकांना ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत ही अट नसेल, अशी अपेक्षा होती. मात्र मुंबई मंडळाने स्पष्ट केले आहे की ही अट या योजनेतही लागू राहणार आहे.
‘बुक माय होम’ प्रणालीद्वारे प्रक्रिया
या घरांच्या विक्रीसाठी बुक माय होम या संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध घरांची माहिती पाहता येईल. आवडीचे घर निवडून त्या घरासाठी अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदार घरावर दावा करू शकतो.
advertisement
यानंतर अर्जदाराला ४८ तासांच्या आत घराच्या एकूण विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम म्हाडाकडे जमा करावी लागणार आहे. ही रक्कम वेळेत भरल्यास घराची खरेदी प्रक्रिया पुढे जाईल. मात्र ४८ तासांच्या मुदतीत १० टक्के रक्कम न भरल्यास संबंधित घरावरील दावा आपोआप रद्द होईल आणि भरलेली अनामत रक्कमही जप्त केली जाईल.
अर्जदारांसाठी सावधगिरी आवश्यक
या योजनेतील अनामत रक्कम घराच्या प्रकारानुसार साधारण एक लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे अर्जदारांनी घर निवडताना आणि आर्थिक नियोजन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. निर्णयात घाई केल्यास मोठी आर्थिक रक्कम गमावण्याची वेळ येऊ शकते.
advertisement
४ मार्चपासून प्रत्यक्ष विक्री
मुंबई मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू असून ४ मार्चपासून घरांची प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे. सोडतीशिवाय घर मिळवू इच्छिणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची संधी ठरणार आहे. मात्र अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 8:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विनासोडत घरांना पाच वर्षांची.., म्हाडाने घेतला मोठा निर्णय! तुमच्यावर काय परिणाम होणार?









