Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत झाली 16 डब्यांची, कसं असेल गणेशोत्सवातील वेळापत्रक?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Vande Bharat Express: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ही गाडी आठ डब्यांसह धावत होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ही गाडी आता 16 डब्यांसह धावणार आहे.
मध्य रेल्वेने 22229/22230 क्रमांकाच्या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 25, 27 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील सीएसएमटीहून तर 26, 28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून धावेल. ही सुविधा केवळ गणेशोत्सवाच्या विशेष गर्दीच्या कालावधीसाठी असणार आहे, असं मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं.
advertisement
जून 2023 मध्ये कोकण रेल्वे मार्गावरून व गोवा राज्यातून पहिल्यांदाच मडगावहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही गाडी सातत्याने भरलेली असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी आता या गाडीचे डबे वाढवण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारीकरणाचा अजून एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत नेण्यात आली आहे. त्याचा रेक आणि प्राथमिक देखभाल व्यवस्था आता नांदेड येथे हलवण्यात आली आहे. मुंबईला याचा थेट फायदा झाला आहे. मुंबईतील पिटलाईन आता मोकळी झाल्याने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा 16 डब्यांचा रेक सहज सामावून घेता येणार आहे.
advertisement
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी कोकण विकास समितीकडून सातत्याने केली जात होती. शेवटी रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करून प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशभक्त आणि कोकणवासीयांसाठी ही एक दिलासादायक बाब असून अधिक प्रवाशांना जलद आणि आरामदायक प्रवास मिळेल, अशी अपेक्षा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत झाली 16 डब्यांची, कसं असेल गणेशोत्सवातील वेळापत्रक?


