भिंतीला आदळून 50 फूट लांब फेकली कार, एअर बॅग ओपन झाल्या तरी दोघांचा जीव गेला, शहापूरजवळ भीषण अपघात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Car Accident At shahpur: मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ असलेल्या आटगाव परिसरात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा चुराडा झाला आहे.
सुनील घरत, प्रतिनिधी शहापूर: मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ असलेल्या आटगाव परिसरात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने संरक्षक भिंतीला धडक दिली. यानंतर ही कार तब्बल ४० ते ५० फूट दूर फेकली गेली. या अपघतात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारच्या दोन्ही एअर बॅग्स ओपन झाल्या तरीही दोघांचा करुण अंत झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भरधाव वेगामुळे कार ४० फूट लांब फेकली
मिळालेल्या माहितीनुसार, ही वॅगनार कार भरधाव वेगाने मुंबई-नाशिक महामार्गावरून जात होती. आटगावजवळ गाडीवरील चालकाचा अचानक ताबा सुटला. नियंत्रण सुटताच कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षित भिंतीच्या कठड्याला इतक्या प्रचंड वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की अपघातानंतर कार सुमारे ४० ते ५० फूट लांबपर्यंत फेकली गेली. यानंतर ही कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर आदळून थांबली.
advertisement
अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, धडकेनंतर कारच्या पुढील बाजूच्या दोन्ही एअरबॅग (Airbag) उघडल्या होत्या, तरीही आतील लोकांना जबर मार लागल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मयुरेश विनोद चौधरी (वय २९, रा. तानसा) आणि जयेश किसन शेंडे (वय २५, रा. उंबरखाड) असं अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. तर हर्षल पांडूरंग जाधव (वय २९, रा. पेंढरघोळ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या हर्षल जाधव यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून, घटनेची नोंद करत पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळेच हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
November 23, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिंतीला आदळून 50 फूट लांब फेकली कार, एअर बॅग ओपन झाल्या तरी दोघांचा जीव गेला, शहापूरजवळ भीषण अपघात


