आधी स्फोट झाला मग धावत्या बसने घेतला पेट, मुंबईत भररस्त्यात अग्नितांडव
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Mumbai Bus Accident: मुंबईतील अत्यंत रहदारीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज एक मोठी दुर्घटना घडली. येथील कांदीवली पूर्व परिसरात एका धावत्या बसला भीषण आग लागली.
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईतील अत्यंत रहदारीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज एक मोठी दुर्घटना घडली. कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरातून जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आगीच्या ज्वाळांसोबतच बसमध्ये मोठे स्फोट झाले आणि अवघ्या काही वेळात बस जळून खाक झाली.
एक्स्प्रेस हायवेवर अग्नितांडव
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून समतानगरच्या दिशेनं जात होती. रस्त्यावरून धावत असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे बसमध्ये मोठे आवाज (स्फोट) झाल्याने महामार्गावरील इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील लोक वेळीच सुखरूप बाहेर पडले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
advertisement
अग्निशमन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचा सांगाडाच शिल्लक राहिला होता. या घटनेमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता.
आगीचे कारण अस्पष्ट
बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समता नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 12:19 PM IST










