Nagpur : रक्ताच्या थारोळ्यात पडली होती 8 वर्षांची धनश्री, नराधम बापाचं संतापजनक कृत्य, नागपूर हादरलं
- Reported by:Uday Timande
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पत्नीने मुलीचा ताबा मागितला त्या रागातून बापाने 8 वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
नागपूर : पत्नीने मुलीचा ताबा मागितला त्या रागातून बापाने 8 वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. नागपूरच्या वाठोडा भागातील सरोदेनगर परिसरात बुधवारी पहाटे ही खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुलीने प्यायला पाणी मागितलं, यानंतर रात्री दारूच्या नशेत असणाऱ्या पित्याने रागाच्या भरात चाकू मुलीच्या छातीत खुपसला.
धनश्री शेंदरे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. धनश्रीचा पिता शेखर याने तिच्या छातीमध्ये चाकू खुपसून तिची हत्या केली आहे. धनश्री ही फक्त 8 वर्षांची होती आणि तिच्या आजी आणि वडिलांसोबत राहत होती. पत्नी शुभांगीसोबत शेखरचे मुलीच्या ताब्यावरून दीर्घकाळ वाद सुरू होते.
शुभांगी ही धनश्रीचा ताबा आपल्यालाच मिळावा, या मागणीवर ठाम होती, ज्याला धनश्रीच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. या वादातूनच शेखरने त्याच्या पोटच्या पोरीचा जीव घेतला आहे. वडिलांनी छातीमध्ये चाकू खुपसल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली धनश्री मदतीसाठी रडत होती. धनश्रीला या अवस्थेत बघताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
advertisement
धनश्रीच्या आजी आणि काकांनी तातडीने पोलीस स्टेशन काढलं. कुसुमबाई शेंदरे यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी शेखर शेंदरेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा दारूच्या आहारी गेला होता, तसंच वारंवार पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. पतीच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नी वेगळी राहत होती आणि मुलीला भेटण्यासाठी लपून यायची. मुलीची आईकडे जाण्याची ओढ शेखरसाठी वादाचे कारण ठरली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 6:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur : रक्ताच्या थारोळ्यात पडली होती 8 वर्षांची धनश्री, नराधम बापाचं संतापजनक कृत्य, नागपूर हादरलं








