Nanded Loksabha Election : 'अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी विजयी' नवनिर्वाचित खासदाराच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nanded Loksabha Election Result : नांदेड लोकसभेत काँगेसचे वसंत चव्हाण यांनी बाजी मारत मोठा विजय संपादन केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना हा धक्का मानला जात आहे.
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : नांदेड लोकसभेची जागा फिक्स करण्यासाठी भाजपने मोठी खेळी करत थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेतलं होतं. मात्र, त्यानंतरही भाजप आपली जागा वाचवू शकले नाहीत. नांदेड लोकसभेसाठी यंदा भाजप आणि काँगेसमध्ये थेट लढत झाली. भाजपकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँगेसकडून माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुरुवातीला ही लढत भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. पण नंतर मात्र काँगेसने देखील जोर धरला. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत काँगेसचे वसंत चव्हाण यांचा विजय झाला आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीत काँगेसचे वसंत चव्हाण 59442 मतांनी विजयी घोषित झाले आहेत. तर भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना 4 लाख 69 हजार 452 मतं पडली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपालाच फटका बसल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडचं राजकीय समीकरण बदलणार असल्याचं दिसत आहे.
advertisement
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी खासदार झालो : वसंतराव चव्हाण
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी खासदार झालो, चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे लोकांमध्ये असंतोष होता अशी प्रतिक्रिया नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी दिली. चव्हाणांना विधानसभेत 90 हजारांचे मताधिक्य होते. पण त्याच मतदार संघात केवळ चारशेचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे लोकांना त्यांचा भाजप प्रवेश अमान्य होता असे चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांचे परत काँग्रेसमध्ये कदापी स्वागत करणार नाही, असेही चव्हाण म्हणाले. दरम्यान भाजपा आणि अशोक चव्हाण यांच्या बद्दलची नाराजी आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे फायदा झाल्याचे वसंत चव्हाण म्हणाले.
advertisement
जनतेचा कौल मला मान्य : प्रताप पाटील चिखलीकर
जनतेचा कौल मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया नांदेडचे महायुतीचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. अशोक चव्हाण यांच्यामुळे फायदा होईल असे वाटले होते. मात्र, नुकसान काही झाले नाही, अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली. माझ्या कामाबद्दल लोकामध्ये कदाचित नाराजी असेल. शिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचा देखील मोठा फटका बसल्याचे प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.
advertisement
भाजपची खेळी फेल
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण आमदार होते. आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्याना राज्यसभा दिली. अर्थात बेरजेचे गणित खेळत भाजपाने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले. नांदेडसह मराठवड्यात अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्षाला फायदा होऊ शकतो असं त्यामागचं गणित होतं.
advertisement
दरम्यान यंदाच्या नांदेड लोकसभा निवडणुकीत मराठा आणि मुस्लिम मतांची टक्केवारी वाढल्याचं पाहायला मिळालं. मुस्लिम बाहुल आणि मराठा बहुल गावात मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही प्रमाणात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा भाजपला फटका बसल्याचं बोललं जात होतं.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
June 04, 2024 11:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Loksabha Election : 'अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी विजयी' नवनिर्वाचित खासदाराच्या वक्तव्याने चर्चेला उधाण