Nashik To Delhi Flights : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! दिल्लीसाठीची विमानसेवा आता दिवसातून 2 वेळा; राजधानीचे अंतर आता होणार कमी वेळेत पूर्ण
Last Updated:
Nashik to Delhi Flights Service : नाशिक आणि दिल्ली दरम्यान विमान प्रवासाची मोठी सोय झाली आहे. कारण आता प्रवाशांना दिल्लीसाठीची विमानसेवा आता दिवसातून दोन वेळा उपलब्ध असेल.
नाशिक : नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नाशिक आणि दिल्लीदरम्यान दिवसातून दोनवेळा थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीने ही सेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सध्या नाशिक विमानतळावरून दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू आणि अहमदाबादसारख्या प्रमुख शहरांसाठी इंडिगोची सेवा सुरू आहे. परंतु नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याने काही महिन्यांपासून ही सेवा आठवड्यात फक्त तीन दिवस चालू होती. आता ते काम पूर्ण झाल्याने प्रवाशांना दररोज दोन वेळा उड्डाणाची सुविधा मिळणार आहे.
ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे नाशिकमधील उद्योगपती, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतहा दिल्लीमार्गे उत्तर भारतातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्यांसाठी ही सेवा फायदेशीर ठरेल. 180 प्रवासी क्षमता असलेले हे विमान नाशिकहून सकाळी आणि सायंकाळी उड्डाण भरेल. वेळापत्रकानुसार सकाळचे विमान व्यावसायिक प्रवाशांसाठी आणि सायंकाळचे विमान परतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
संपूर्ण वेळापत्रक आले समोर
दरम्यान 28 ऑक्टोबरपासून नाशिकहून जयपूर आणि हैदराबादसाठीही विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर आणि जयपूर मार्गावरील सेवा थांबवण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत होती. आता इंडिगोने या दोन्ही मार्गांवरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूर-इंदूर-नाशिक विमान सकाळी 11.45 वाजता जयपूरहून निघून दुपारी 2.40 वाजता नाशिकला पोहोचेल आणि दुपारी तीन वाजता नाशिकहून जयपूरकडे रवाना होईल.
advertisement
हैदराबादसाठीचे विमान सकाळी 6.50 वाजता हैदराबादहून निघून 8.40 वाजता नाशिकला पोहोचेल. त्यानंतर ते सकाळी नऊ वाजता नाशिकहून परतीचे उड्डाण घेईल आणि 10.45 वाजता हैदराबादला पोहोचेल. या नवीन आणि पुनः सुरू होणाऱ्या सेवांमुळे नाशिक विमानतळावरील प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
इंडिगो कंपनीने नाशिकला राष्ट्रीय स्तरावर अधिक जोडणी मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नाशिक विमानतळ आता व्यवसाय, पर्यटन आणि प्रवासासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. या विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाशिकचा दिल्ली, जयपूर, हैदराबाद आणि इंदूरसारख्या शहरांशी थेट संपर्क वाढेल जे संपूर्ण प्रदेशाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik To Delhi Flights : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! दिल्लीसाठीची विमानसेवा आता दिवसातून 2 वेळा; राजधानीचे अंतर आता होणार कमी वेळेत पूर्ण