Shirdi : शिर्डीत भाविकांसाठी नवा नियम, साईबाबांच्या दर्शनासाठी रिकाम्या हातानेच जा!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shirdi News : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने आजपासून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही भाविकाला फुलं, हार किंवा प्रसाद घेऊन मंदिरात प्रवेश करता येणार नाही.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी, अहिल्यानगर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असताना, शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही अतिदक्षतेचे पाऊल उचलण्यात आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने आजपासून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही भाविकाला फुलं, हार किंवा प्रसाद घेऊन मंदिरात प्रवेश करता येणार नाही.
ही बंदी रविवार, 11 मे 2025 पासून अंमलात आणली असून सकाळपासूनच मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. भाविकांची व्यक्तिगत तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय, फुलं-प्रसाद हे मंदिराच्या प्रवेशद्वावर सुरक्षा रक्षकांकडून जप्त करण्यात येत आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांपैकी बऱ्याच जणांकडे साईबाबांच्या पूजेकरिता हार, फुलं व प्रसाद असतो. परंतु आता हे सर्व गेटवरच जमा करून घेतले जात आहेत. भाविकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली असली तरी साई संस्थान प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांकडून समजूत काढली जात आहे. साई मंदिरात हार प्रसाद घेऊन जाण्यास आणखी किती वेळ बंदी असेल याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली नाही. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलेल्या निर्णयाला भाविकांना प्रतिसाद द्यावा असे आवाहन साई संस्थानाकडून करण्यात आले आहे.
advertisement
भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी उद्या रविवारपासून मंदिरात प्रवेश करताना काही नव्या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. फुलं, हार आणि प्रसाद मंदिरात नेण्यास बंदी घालण्यात आली असून मोबाईल फोन घेऊन मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
सिद्धीविनायक मंदिरातही मनाई
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. हा नियम आजपासून लागू झाला आहे. भाविकांना फक्त जास्वंदाचे फुल नेता येणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 11, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi : शिर्डीत भाविकांसाठी नवा नियम, साईबाबांच्या दर्शनासाठी रिकाम्या हातानेच जा!