Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, CM फडणवीसांनी फटकारलं, ही कृती म्हणजे...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:SIDHARTH GODAM
Last Updated:
Devendra Fadnavis :मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस भाषण करताना काही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांच्या या कृतीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत जीआर काढला. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या गदारोळावर नाराजी व्यक्त केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ घालणे म्हणजे स्वातंत्र्य सेनानींचा अपमान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
advertisement
पोलिसांकडून तीन आंदोलक ताब्यात...
दरम्यान, पोलिसांनी 3 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये रामभाऊ कोंडाजी पेरकर (70 वर्ष), शिवाजी बाबुराव गाडेकर (59 वर्ष) आणि अशोक सिंग किसन सिंग शेवगण (62 वर्ष) यांचा समावेश आहे. रामभाऊ पेरकर हे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारे युती सरकार मुर्दाबाद, छगन भुजबळ झिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
advertisement
हे पोलिसांचे अपयश...
या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आंदोलन करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य नव्हतं. यासाठी सर्वात जबाबदार अपयशी पोलीस यंत्रणा आहे. सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली असल्याचेही त्यांनी म्हटले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 17, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, CM फडणवीसांनी फटकारलं, ही कृती म्हणजे...