Beed News: "माझं लेकरू मेलं नाही, त्याला उद्धव कराडने मारलंय", परळीत श्रीनाथच्या आईने टाहो फोडला
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
साने गुरुजी आश्रम शाळेची संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाईची मागणी आईने केली आहे.
बीड : बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर आता बीडमधील एका तरुणाने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील दागौळ येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या श्रीनाथ गीते याच्या आईला अश्रू अनावर झाले आहे. साने गुरुजी आश्रम शाळेची संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाईची मागणी आईने केली आहे. श्रीनाथ आर्थिक आणि मानसिक त्रासात असल्याचं बोललं जात आहे.
"2010 मध्ये माझे पती वारले , 2016 पासून आम्ही माझ्या मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. सगळं त्या साने गुरुजी शाळेच्या उद्धव कराडने केलं आहे... माझं लेकरू मेलं नाही त्यांनी मारलंय.. त्याचा मानसिक छळ करून.. एक तर त्याचे जेवढे शिक्षण होतं त्या पदाची नोकरी त्याला दिली नाही. आमच्या परिस्थितीमुळे त्यांना आहे त्या पदावर होकार दिला. त्यातही त्याला खूप टॉर्चर केलं, मला तो सांगायचा आई मला खूप काम करायला लावतात. महिनाभरापासून त्याचा त्रास वाढला होता. चार चार माणसाचं काम त्याला एकट्याला सांगत होते . संस्थाचालकाने माझ्या लेकराला मारलं..उद्धव कराडच्या साने गुरुजी आश्रम शाळेची चौकशी करावी त्याने आजवर कोणाकोणाला नोकरीत घेतले हे देखील तपासावे," अशी मागणी आता श्रीनाथ याची आई सुनिता गीते यांनी केली आहे.
advertisement
शाळेचे मुख्याध्यापक काय म्हणाले?
मुख्यध्यापक अरुण पवार म्हणाले, श्रीनाथ गीते हा महिनाभरापूर्वी आमच्याकडे ऑर्डर घेऊन आला होता. आमच्या संस्थेमध्ये जागा शिल्लक नसताना देखील वरिष्ठांनी ऑर्डर दिलेली असल्याने आम्ही त्याला रुजू करून घेतले होते. त्याने कागदपत्राची पूर्तता देखील केली होती, केवळ जात पडताळणीचे प्रमाणपत्र बाकी होते. यादरम्यानच दोन दिवसापूर्वी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि त्याने मुख्याध्यापकांना आईची तब्येत खराब झाली आहे म्हणून मला जायचे आहे असे सांगितले. तेव्हा तो जो गेला तो परत आला नाही, जी घटना घडली त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी आमची देखील मागणी आहे.
advertisement
परळी पोलिस स्थानकात गुन्हा
श्रीनाथ गोविंद गित्ते या तरुणाने आश्रम शाळा चालक राठोड आणि उद्धव कराड यांच्या त्रासाला कंटाळून 22 ऑगस्ट रोजी नंदागौळ येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 23, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: "माझं लेकरू मेलं नाही, त्याला उद्धव कराडने मारलंय", परळीत श्रीनाथच्या आईने टाहो फोडला








