शिक्षण वाया जात नाही! गायत्री यांनी 200 जणांना पायावर केलं उभं, तरूणांच्या हाती दिला रोजगार!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
करिअरच्या पारंपरिक चौकटी मोडून स्वतःचा नवा मार्ग तयार करण्याचं धाडस फार कमी लोक करतात. मात्र नागपूरच्या रहिवासी आणि फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी. धारक असलेल्या गायत्री तिवसकर यांनी हे धाडस केलं. त्यातून एक यशस्वी उद्योजकतेचा प्रवास त्यांनी सुरू केला आहे.
पुणे: करिअरच्या पारंपरिक चौकटी मोडून स्वतःचा नवा मार्ग तयार करण्याचं धाडस फार कमी लोक करतात. मात्र नागपूरच्या रहिवासी आणि फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी. धारक असलेल्या गायत्री तिवसकर यांनी हे धाडस केलं. त्यातून एक यशस्वी उद्योजकतेचा प्रवास त्यांनी सुरू केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत असताना मनात सतत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती.
संशोधनाची आवड, कुतूहल आणि नव्या संधी शोधण्याची वृत्ती यामुळे त्यांचे लक्ष पारंपरिक नसलेल्या पण संभाव्यतेने भरलेल्या एका क्षेत्राकडे गेले ते म्हणजेच मोतीपालन. मोतीपालनाविषयी प्रथम माहिती मिळाल्यानंतर गायत्री यांनी तब्बल दोन वर्षे या व्यवसायाचा अभ्यास, रिसर्च, व्यवहार्यता, उत्पादन प्रक्रिया आणि बाजारातील मागणी यांचा तपशीलवार अभ्यास केला. मोती कसे तयार होतात? शिंपल्यांची गुणवत्ता कशी ठरवायची? पाण्याचे योग्य मापदंड कोणते? फीडिंग कसं करायचं? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे शोधत त्यांनी स्वतःला पूर्णपणे तयार केलं.
advertisement
त्यानंतर पुण्यात आणि नागपूर मध्ये त्यांनी स्वतःचं मोतीपालन प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. गेल्या चार वर्षांत त्यांनी 200 हून अधिक शेतकरी, महिला गट, तरुण उद्योजक यांना मोतीपालनाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं. मोतीपालनाचं वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय कमी जागेत, कमी खर्चात आणि घरच्या घरीसुद्धा करता येतो. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील अनेकांसाठी हा व्यवसाय स्थिर उत्पन्नाचं साधन ठरू लागला आहे. मोती तयार होण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागतो. पण त्या दोन वर्षांतही शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळू शकतो, कारण या क्षेत्रात जोडव्यवसायांची मोठी संधी आहे.
advertisement
शिंपले पुरवठा, नुक्लिअस बनवणे, पाण्याची ट्रीटमेंट, तसेच मोत्यांच्या शेलपासून दागिन्यांची निर्मिती या सर्वांत स्वतंत्र उत्पन्नाचे मार्ग आहेत. गायत्री तिवसकर यांचे प्रशिक्षण केंद्र या सर्व गोष्टींवर प्रत्यक्ष मार्गदर्शन देते. पुणे, नागपूर, चंद्रपूरसारख्या भागांत त्या सातत्याने वर्कशॉप घेतात. त्यांनी स्थापन केलेले अग्यास पर्ल फार्मिंग हे मोतीपालन प्रशिक्षण आणि उत्पादन क्षेत्रात एक विश्वसनीय नाव बनलं आहे. वार्षिक 10 लाखांपर्यंतची उलाढाल करत त्यांनी स्वतःच्या उद्योजकतेला मजबूत पाया तर दिलाच, पण त्याहूनही मोठं योगदान म्हणजे ग्रामीण भागातील शेकडो शेतकऱ्यांना नवीन रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
advertisement
गायत्री तिवसकर यांची पुढची स्वप्नंही तितकीच प्रेरणादायी आहेत. त्या सांगतात, भविष्यात महिलांसाठी स्वतंत्र वूमन-लीड बिझनेस क्लस्टर उभारण्याची माझी इच्छा आहे. मोतीपालनातून ग्रामीण महिलांना स्थिर उत्पन्न, तांत्रिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी मिळाव्यात, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. ज्ञान, संशोधन, धैर्य आणि सातत्य यावर उभारलेल्या त्यांच्या प्रवासामुळे आज अनेक तरुण, शेतकरी आणि महिला उद्योजक प्रेरित होत आहेत. मोतीपालन या कमी परिचित असलेल्या व्यवसायाला त्यांनी दिलेल्या नवीन ओळखीमुळे महाराष्ट्रात उद्योजकतेचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 18, 2025 9:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिक्षण वाया जात नाही! गायत्री यांनी 200 जणांना पायावर केलं उभं, तरूणांच्या हाती दिला रोजगार!

