Mahesh Landge: अजितदादांच्या तालमीत तयार झालेल्या पठ्ठ्यानेच त्यांना कसं आव्हान दिलंय? दादांवर पुन्हा 'ख्वाडा'?

Last Updated:

Mahesh Landge vs Ajit Pawar PCMC Election 2026 पिंपरी चिंचवडच्या लढाईत महेश लांडगे यांनी टाकलेले डाव सरस ठरतात की तालमीचे वस्ताद अजित पवार वरचढ ठरणारय़ याकडे पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

महेश लांडगे आणि अजित पवार
महेश लांडगे आणि अजित पवार
पुणे : उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शहर बनविण्याचा चंग बांधून जोमाने काम केलेल्या अजित पवार यांना काही कारणांनी २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत झटका बसला. 'केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र' अशी घोषणा आणि भाजपचा विकासाभिमुख प्रचार यामुळे अजित पवार यांची सत्ता खालसा करून भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा महापालिकेवर रोवला. भाजपच्या यशात लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा सिंहाचा वाटा राहिला. आता आठ वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीतही अजित पवार यांना धोबीपछाड देण्यासाठी पैलवान आमदार महेश लांडगे सज्ज झाले आहेत. अजित पवार यांच्या तालमीत तयार झालेले महेश लांडगे त्यांच्यावर 'ख्वाडा' डाव टाकून मंत्रि‍पदावरची दावेदारी पक्की करतायेत. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही लांडगे यांच्या मागे भरभक्कम ताकद उभी केली आहे. या संघर्षात लांडगे यांनी टाकलेले डाव जिंकतात की तालमीचे वस्ताद अजित पवार वरचढ ठरतात, याकडे पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवार आणि पिंपरी चिंचवडचे खास नाते राहिले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवातच पिंपरी चिंचवडपासून झाली, असे म्हणता येईल. बारामती लोकसभा मतदारसंघात त्यावेळी पिंपरी चिंचवड शहराचा सहभाग होता. त्यावेळी पिंपरी चिंचवडकरांनी साथ दिल्याने अजित पवार यांनी लोकसभेत पाऊल ठेवले.  नुकतेच आकाराला येत असलेले आणि नव्याने उभे राहू पाहत असलेले पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी त्यावेळी अजित पवार यांनी स्वीकारली. गावकी-भावकीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी पक्ष बांधला. सुरुवातीच्या काळात भोसरीचे लांडगे, पिंपळे सौदागरचे काटे, भोसरीचे लांडे, फुगेवाडीचे फुगे तसेच चिंचवडचे चांदेरे अशा गाववाल्या विविध सहकाऱ्यांना संधी देऊन अजित पवार यांनी हळूहळू पिंपरी चिंचवड शहरावर पकड मिळवली. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे विकासनिधीच्या देवघेवीमुळे अनेक नवे सहकारी देखील अजित पवार यांना जोडले गेले. अगदी काही वर्षातच अजित पवार यांनी शहर आणि महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले. परंतु २०१३ च्या सुमारास केंद्रात आणि राज्यात अनुक्रमे नरेंद्र मोदी-देवेंद्र फडणवीस या जोडीचा उदय झाल्यानंतर अजित पवार यांच्या वर्चस्वाला शह देण्याचे काम फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यावेळी फडणवीसांच्या गळाला लागले-आक्रमक महेश लांडगे आणि इतरही बरेच सहकारी!
advertisement

महेश लांडगे अजित पवारांच्या विरोधात कसे गेले?

महेश लांडगे आणि अजित पवार यांचे अतिशय घनिष्ट संबंध. अजित पवार यांच्याच सहकार्याने महेश लांडगे यांनी राजकारणात जम बसवला. लांडगे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत पहिल्यांदा २००४ ला नगरसेवक म्हणून निवडून आले. २००७ आणि २०१२ ला देखील त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांची राजकारणात उत्तम भरभराट होत होती. त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा जाग्या होण्याचा हाच तो काळ..! झालेही तसेच! २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली. परंतु अजित पवार यांनी त्यांना तिकीट नाकारले. हा लांडगे यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का ठरला. त्यांनीही राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मतदारराजाने साथ दिल्याने लांडगे यांनी पहिल्याच प्रयत्नात अपक्ष म्हणून विधानसभेत पाऊल ठेवले. इथेच सुरुवात झाली अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील थेटपणे संघर्षाला!
advertisement

अन् महेश लांडगे यांनी झालेल्या अपमानाचा वचपा काढला!

देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होऊन अगदी दोन अडीच वर्ष झाले होते. अति महत्त्वकांक्षी सहकाऱ्यांचे पंख कापल्यानंतर त्यांनाही त्यांची नवी टीम बांधायची होती. त्यांनी महेश लांडगे यांच्यातील 'पवारविरोध' हेरून पैलवानाला आपल्या तालमीत घेण्याचे ठरवले. महेश लांडगे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्याचे निश्चित केले. अखेर २०१६ ला लांडगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याचवेळी अजित पवारांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. केवळ निर्धार करून ते थांबले नाहीत. लक्ष्मण जगताप यांच्या साथीने त्यांनी डावपेच आखले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात त्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी केली. महापालिका निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना विठ्ठल मुर्ती घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीच्या महापौर-उपमहापौरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून अजितदादांच्या राष्ट्रवादीला बॅकफूटला जायला भाग पाडले. अत्यंत आक्रमकपणे लांडगे-जगताप या जोडगोळीने प्रचार करून अजित पवार यांच्या दीड दशकाच्या सत्तेला सुरूंग लावला. १२८ जागांपैकी तब्बल ७७ जागा खेचून आणत अजित पवार यांना पराभवाची धूळ चारून विधानसभेची उमेदवारी न दिल्याचा बदला घेतला.
advertisement

वस्ताद जिंकणार की पठ्ठ्या बाजी मारणार?

विधानसभा निवडणूक २०१९ आणि २०२४ ला देखील महेश लांडगे यांनी विजय मिळवला. आता महापालिका निवडणुकीत विजयश्री मिळवून आपली ताकद पुन्हा अजित पवार यांना दाखविण्याची संधी त्यांच्याकडे आहे. याच कामी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि ज्येष्ठ मंत्री बावनकुळे त्यांना रसद पुरवताहेत. 'महेश लांडगे यांनी पैलवानकी सोडलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना गारद करायला आपल्याला डाव टाकायचाय', अशा आशयाचे भाषण करून रविंद्र चव्हाण यांनी लांडगेंच्या शिडात पवारविरोधाची हवा जोरात भरली आहे. त्यामुळे लांडगे पुन्हा अजितदादांना धोबीपछाड देतात की अजितदादा गमावलेला बालेकिल्ला पुन्हा मिळवतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahesh Landge: अजितदादांच्या तालमीत तयार झालेल्या पठ्ठ्यानेच त्यांना कसं आव्हान दिलंय? दादांवर पुन्हा 'ख्वाडा'?
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement