हृदयद्रावक! कचऱ्याच्या डम्पिंगसाठी खोदलेला खड्डा ठरला मृत्यूचा सापळा, मूकबधीर मुलाचा मृत्यू
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
- Published by:Prachi Amale
Last Updated:
काटोल नगरपरिषदेच्या कचरा डम्पिंग साइटवर जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे खोदले गेले आहेत.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेडयावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विराट राणा (वय 12) या मूकबधीर मुलाचा पाण्याने साचलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विराट सकाळी खेळत असताना अचानक पाय घसरून या खड्ड्यात पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काटोल नगरपरिषदेच्या कचरा डम्पिंग साइटवर जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे खोदले गेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून याच पाण्यात पडून विराटचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या परिसरात पारधी समाज मोठ्या संख्येने राहतो. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी खड्डे बुजवावेत आणि डम्पिंग साइट इतरत्र हलवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
advertisement
मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार, स्थानिकांचा आरोप
विराटच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई माधुरी राणा पवार यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनाची ठोस पावले उचलण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू असून, सखोल चौकशी करण्याची मागणी आदिवासी पारधी समाजाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर काटोल नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुन्हा अशी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
advertisement
नागरिकांच्या मनात भीती
प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा अंत कधी होणार? जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का? नागरिकांच्या रोषाला आता उधाण आलं असून तीव्र टीका होत आहे. या घटनेनं केवळ एक कुटुंबच उद्ध्वस्त झालं नाही, तर नागरिकांच्या मनात भीती आणि संताप निर्माण केला आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हृदयद्रावक! कचऱ्याच्या डम्पिंगसाठी खोदलेला खड्डा ठरला मृत्यूचा सापळा, मूकबधीर मुलाचा मृत्यू









