नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
PM Modi:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, वने मंत्री गणेश नाईक, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जपानचे राजदूत ओनो केइची, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
advertisement
आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होते, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असली, तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘प्रगती’ उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
advertisement
विमानतळाबरोबरच अटल सेतू, 40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो हे प्रकल्पही जलद गतीने पूर्ण झाले आहेत. या मेट्रोच्या निर्मितीत जपान सरकार आणि जायका संस्थेचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
‘मुंबई वन’ या सर्वसमावेशक वाहतूक ॲपद्वारे मेट्रो, मोनोरेल, बस, उपनगरी रेल्वे आणि वॉटर टॅक्सी या सर्व वाहतूक साधनांसाठी एकाच तिकीटाची सुविधा मिळणार आहे. तसेच, तरुणांसाठी कौशल्य विकास विभागाच्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या असून, विमानतळ आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली भेट असून याच ठिकाणी देशातील पहिले ऑफशोर विमानतळ तयार करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चौथी मुंबई तयार होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 9:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन