शिर्डी हादरली! 15 वर्षीय मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; 'द केरळ स्टोरी' सारखा धक्कादायक प्रकार
- Reported by:Harish Dimote
- Published by:Prachi Amale
Last Updated:
इरफानने मुलीचा विनयभंग केल्यानंतर पीडित मुलीने घाबरत आपल्या कुटुंबीयांना हा सर्व प्रकार सांगितला.
अहिल्यानगर : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून, तिला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या इरफान शेख नामक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीला साथ देणारा त्याचा भाऊ आणि भावजय यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या पीडित मुलीला गेल्या काही दिवसांपासून इरफान शेख हा त्रास देत होता. आरोपी इरफान हा केवळ मुलीचा पाठलागच करत नव्हता, तर तिला इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत मेसेज करून लग्नासाठी गळ घालत होता. धक्कादायक बाब म्हणजे, या कृत्यात इरफानला त्याचा भाऊ अरबाज शेख आणि भावजई आयेशा शेख यांनी देखील साथ दिली. या तिघांनी मिळून पीडितेवर धर्मांतर करून लग्न करण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला होता.
advertisement
बजरंग दलाची मध्यस्थी आणि पोलिसांत धाव
इरफानने मुलीचा विनयभंग केल्यानंतर पीडित मुलीने घाबरत आपल्या कुटुंबीयांना हा सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी तातडीने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आणि इरफान शेख याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुख्य आरोपी इरफान पोलिसांच्या कोठडीत असून, त्याचे भाऊ-भावजय फरार झाले आहेत.
advertisement
धर्मांतर बंदी कायद्याची गरज
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष शुभम मर्तडक यांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार म्हणजे साक्षात 'द केरळ स्टोरी' चित्रपटातील दृश्यांसारखा आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अशा घटना रोखण्यासाठी सरकारने आता कठोर 'धर्मांतर बंदी कायदा' लागू करण्याची वेळ आली आहे, असे मर्तडक यांनी म्हटले आहे.
advertisement
अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ
सध्या शिर्डी पोलीस फरार अरबाज शेख आणि आयेशा शेख यांचा शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 5:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिर्डी हादरली! 15 वर्षीय मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; 'द केरळ स्टोरी' सारखा धक्कादायक प्रकार










