अमित शहांचा दौरा ठरणार ‘गेम चेंजर’? महायुतीतील तणावावर तोडगा निघणार
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
राज्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. महायुतीतील अंतर्गत धुसफुसीवर तोडगा काढण्यासाठी आणि आगामी निवडणुकांची तयारी तपासण्यासाठी हा दौरा निर्णायक ठरणार आहे.
मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा वेग घेतला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या भवितव्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा आज महायुतीतील तीनही घटक पक्ष भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वरिष्ठ नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची शक्यता आहे. अलीकडेच महायुतीत वाढलेल्या नाराजीच्या आणि धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर शहांची ही बैठक निर्णायक ठरू शकते.
advertisement
ठाणे आणि पुणे या ठिकाणी भाजप आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचं चित्र अलीकडे दिसून आलं आहे. या संघर्षांबाबत अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीत परस्पर वाद उघडपणे समोर येऊ नयेत, जनतेपुढे एकसंध आणि स्थिर युतीचे चित्र निर्माण व्हावे, यासाठी शहा विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
याशिवाय 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देण्यासाठी आणि महायुतीच्या रणनीतीला धारदार बनवण्यासाठी शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्याचाही कार्यक्रम शहा यांच्या दौऱ्यात समाविष्ट असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक मतदारसंघातील संघटनात्मक स्थिती, प्रचारयोजना आणि उमेदवार निवडीसंदर्भातही प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय तणाव, अंतर्गत नाराजी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा दौरा केवळ ‘रुटीन’ भेट नसून, महाराष्ट्रातील सत्तासमीकरणावर परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 27, 2025 1:01 PM IST










