Raju Patil Pratap Sarnaik : 'राजकारणाचे गांडूळ वळवळले', मनसे नेत्याचा सरनाईकांना टोला, 10 थरांच्या विक्रमानंतर राजकारण तापलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raju Patil on Pratap Sarnaik Jay jawan : जय जवान गोविंदा पथकाने एकाच दिवशी सलग तीन वेळेस 10 थर उभारल्यानंतर मनसे नेते राजू पाटील आणि सरनाईक पितापुत्रांना टोला लगावला आहे.
मुंबई: मुंबई, ठाण्यासह राज्यात मोठ्या उत्साहात दहिहंडीचा उत्सव पार पडला. यंदाच्या दहिहंडीमध्ये जोगेश्वरी येथील कोकण नगर आणि जय जवान गोंविदा पथकाने 10 थर रचत विक्रम नोंदवला. मात्र, या 10 थरांवरून आता राजकारण पेटलं आहे. जय जवान गोविंदा पथकाने एकाच दिवशी सलग तीन वेळेस 10 थर उभारल्यानंतर मनसे नेते राजू पाटील आणि सरनाईक पितापुत्रांना टोला लगावला आहे. संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे? असं राजू पाटील सरनाईक यांना सुनावले.
मागील काही वर्षांपासून दहिहंडी उत्सवाला चांगलंच ग्लॅमर मिळाले आहे. दहिहंडी उत्सवात राजकारणी मंडळींनी या उत्सवात स्पर्धेच्या माध्यमातून आणखीच ग्लॅमर आणलं. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या दहिहंडी सुरू झाल्या. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या दहिहंडीवरून राजकारण तापलं आहे. सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहिहंडी उत्सवात शनिवारी जोगेश्वरीतील कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून विश्वविक्रम प्रस्थापित केला. यानंतर प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. परंतु, जय जवान मंडळाने काल संध्याकाळी सरनाईकांच्या दहीहंडी उत्सवात येऊन त्याच जागेवर 10 थर रचून दाखवले. जय जवान पथकाने एकदा नव्हे तर तीन वेळेस 10 थर रचले.
advertisement
कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाच्या या विक्रमी कामगिरीवर गोविंदाप्रेमी चांगलेच आनंदी दिसले. प्रताप सरनाईक यांच्या सकाळी केलेल्या टिप्पणीवर मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी रोखठोक भाष्य केले. राजू पाटील यांनी म्हटले की, मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते, अशी बोचरी टीका केली.
advertisement
त्यांनी पुढे म्हटले की, आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा 10 थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा 10 थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे? असा टोला लगावला.
advertisement
मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका… pic.twitter.com/zE5R9Ia4Ca
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 16, 2025
advertisement
सरनाईक काय म्हणाले होते?
शनिवारी सकाळी कोकण नगर मंडळाने 10 थर रचत विक्रम केला. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी म्हटले, कोणी काहीही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना वाटत असतं की, आमचा विश्वविक्रम मोडणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत. पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की, विश्वविक्रम ही कोणा एकाची मक्तेदारी नसते. विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. सरनाईक यांच्या वक्तव्याने राजकीय वादाची ठिणगी पडली. कोकण नगरने ठाण्यात 10 थरांचा विक्रम केल्यानंतर त्याच्या काही वेळेनंतर जय जवान गोविंदा पथकाने घाटकोपरमध्ये 10 थर रचत विक्रमाची बरोबरी केली.
advertisement
सरनाईक विरुद्ध जय जवानचा वाद काय?
प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रो-गोविंदा स्पर्धेतून जय जवानला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप झाला होता. मात्र, जय जवान पथकाने उशिराने प्रवेशिका पाठवल्याने त्यांना सहभागी करून घेता आले नसल्याचे सरनाईक यांनी म्हटले.
मागील महिन्यात पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र आले. त्यांच्या या युतीला आणि मराठी माणसाच्या आंदोलनाला जय जवान पथकाने थर रचत सलामी दिली होती. त्यामुळेच त्यांना सरनाईक यांच्या स्पर्धेत सहभागी करून घेतले नव्हते असा आरोप करण्यात आला होता.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
August 17, 2025 9:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raju Patil Pratap Sarnaik : 'राजकारणाचे गांडूळ वळवळले', मनसे नेत्याचा सरनाईकांना टोला, 10 थरांच्या विक्रमानंतर राजकारण तापलं