Uddhav Thackeray: आम्हाला तुमच्या मदतीची गरज, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा थेट 'मातोश्री'वर फोन, पडद्यामागील घडामोडींना वेग
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख (५ मार्च) जवळ येत असतानाच, महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून खलबतं सुरू झाली आहेत.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख (५ मार्च) जवळ येत असतानाच, महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेस हायकमांडने शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील मविआची एकमेव हक्काची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती केली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याने थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातून राज्यसभेचे ७ खासदार २ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे ६ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. जर भाजपने सातवा उमेदवार उभा केला, तर मविआच्या एकमेव जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळू शकते. राज्यसभेसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेससाठी 'अंकगणित' का महत्त्वाचे?
काँग्रेससाठी ही जागा केवळ प्रतिष्ठेची नसून 'अंकगणिताची गरज' बनली आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी काँग्रेसला किमान २५ खासदारांची (एकूण २४५ च्या १०%) आवश्यकता आहे. सध्या काँग्रेसकडे २७ खासदार आहेत, मात्र २०२६ मध्ये अनेक सदस्य निवृत्त होत असल्याने मल्लिकार्जुन खर्गे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते. ही स्थिती टाळण्यासाठी महाराष्ट्रातील ही जागा काँग्रेसच्या पदरात पडणे अत्यंत आवश्यक आहे. तर, दुसरीकडे शरद पवार यांना उमेदवारी दिल्यास आणि राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास ते एनडीएमध्ये जाण्याची भीती काँग्रेसला आहे. अशातच विरोधी बाकावरील ताकद कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
आता राज्यसभेला पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला..., काँग्रेसने काय म्हटले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडल्यास, पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषद (MLC) निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेना (ठाकरे गट) उमेदवाराला पाठिंबा देईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म संपत आहे. त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी काँग्रेस मदत करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
advertisement
राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर...
दरम्यान, मंगळवारी सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या जागेसाठी शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. तर, "मविआमध्ये कोणताही पेच नाही. सर्व पक्ष एकमेकांच्या संपर्कात असून उमेदवार ठरला नसल्याचे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 9:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: आम्हाला तुमच्या मदतीची गरज, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा थेट 'मातोश्री'वर फोन, पडद्यामागील घडामोडींना वेग










