Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ठाण्यातील कुटुंबाला काळानं गाठलं, चालकाच्या 'त्या' एका डुलकीनं माय-लेकाचा श्वास हिरावला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Samruddhi Mahamarg Accident: पहाटेच्या वेळी प्रवासाचा थकवा आणि झोपेमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार समोरून जाणाऱ्या एका अवजड कंटेनरवर मागून प्रचंड वेगाने आदळली.
नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ठाण्याच्या कुटुंबावर काळाने झडप घातली. गाडी चालवताना चालकाला लागलेली एक छोटीशी डुलकी संपूर्ण कुटुंबासाठी जीवघेणी ठरली असून, या दुर्घटनेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब ठाण्याहून नागपूरच्या दिशेने आपल्या कारने (नागपूर कॉरिडॉर) जात होते. पहाटेच्या वेळी प्रवासाचा थकवा आणि झोपेमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. चॅनेज क्रमांक ३९/९०० जवळ कार समोरून जाणाऱ्या एका अवजड कंटेनरवर मागून प्रचंड वेगाने आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा समोरचा भाग कंटेनरच्या खाली घुसला आणि गाडीचा चक्काचूर झाला.
advertisement
आई-मुलाचा करुण अंत
या अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला. तिचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. एकाच वेळी कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वाहतूक काही काळ विस्कळीत
अपघातामुळे कार रस्त्याच्या मधोमध अडकली होती, ज्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला सारली आणि काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत केली. महामार्गावर होणारे हे 'हायवे हिप्नोसिस' आणि झोपेमुळे होणारे अपघात आता चिंतेचा विषय ठरत आहेत.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 12:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ठाण्यातील कुटुंबाला काळानं गाठलं, चालकाच्या 'त्या' एका डुलकीनं माय-लेकाचा श्वास हिरावला










