महाराष्ट्राच्या या गावात सापडला 800 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा 'साक्षीदार', गावकऱ्यांची एकच गर्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
वीरगळ म्हणजेच इतिहासाच्या अभ्यासाचे एक वस्तुरूपी साधन होय. गावोगावी कधी पाराजवळ तर कधी शेतावर, इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले वीरगळ पाहायला मिळतात.
सांगली: वीरगळ म्हणजेच इतिहासाच्या अभ्यासाचे एक वस्तुरूपी साधन होय. गावोगावी कधी पाराजवळ तर कधी शेतावर, इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले वीरगळ पाहायला मिळतात. यापैकी सांगलीच्या देवराष्ट्रे गावात पिढ्यानपिढ्या शेंदूर फासून, नारळ वाहून श्रद्धेने पूजले जाणारे चार वीरगळ इतिहास संशोधकांच्या निदर्शनास आलेत. आजवर धार्मिक कारणांनी पुजल्या गेलेल्या या वीरगळांचे ऐतिहासिक महत्त्व काय? पाहुयात.
देवराष्ट्रे गावाच्या पूर्व बाजूला, कुंडल मार्गे गावामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला ग्रामपंचायतीच्या पडीक जागेत चार वीरगळ अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत पडलेले दिसतात. अलीकडेच गावात संशोधनासाठी पोहोचलेल्या इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या पाहणीनंतर देवराष्ट्रे गावचा आणखी एक ऐतिहासिक ठेवा प्रकाशात आला आहे.
advertisement
गावातील लोक आजही थळपांढरी म्हणून या वीरगळांची पूजा करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस झेलत झिजत चाललेला हा अनमोल सांस्कृतिक ठेवा गावकऱ्यांचा श्रद्धेपोटी का असेना आणि दुर्लक्षित अवस्थेत का असेना पण पाहायला मिळतोय.
देवराष्ट्रे गावातील याच वीरगळांवरती प्रत्यक्ष पाहणीनंतर अज्ञात इतिहासावर संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी काही प्रमाणात प्रकाश टाकत थळपांढरी म्हणून पुजल्या जाणाऱ्या वीरगळांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले आहे.
advertisement
इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, वीरमरण पावलेल्या योद्धांच्या आणि सती गेलेल्या स्त्रियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशा शिळा उभारल्या जात. याशिवाय या शिळा राष्ट्रकूट ते यादव कालखंडातील परंपरांचा स्पष्ट दाखला देतात. शिळेचे खालून वर वाचन करताना दिसणारे लढाईचे प्रसंग, शिवलिंग पूजन आणि कलशारोहण गावच्या हजारो वर्ष जुन्या इतिहासाला साक्ष देतात.
शतकानुशतके हे वीरगळ निशब्दपणे गावाचा इतिहास घेऊन उभे आहेत. छन्नी हातोड्याने कोरलेले हे केवळ आयताकार दगड नाहीत तर त्यामागे इतिहास आहे. लढाईच्या प्रसंगांची कोरीव चित्रे, शिवलिंग पूजनाचे प्रतीक आणि सर्वात वर कलशारोहण यातून प्राचीन शौर्यपरंपरेचा वारसा दिसून येतोय. या शिळा इतिहासाचा दुर्मिळ आणि मौल्यवान पुरावा आहेत. कोरीव कामाची शैली, कप्प्यांची उभारणी आणि प्रतिमांची भाषा यावरून यांचा काळ किमान 800 वर्षांहून अधिक जुना असावा. देवराष्ट्रे गावची उत्पत्ती, संस्कृती आणि शौर्याचा तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याचे वैज्ञानिक पद्धतीने जतन-संवर्धन करण्याची गरज इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर अधोरेखित करतात.
advertisement
गाव परिसराचा हजारो वर्ष जुना इतिहास उलगडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे, इतिहासाचे मूक साक्षीदार असणाऱ्या वीरगळांचे यशवंतभूमीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन झाल्यास निश्चितच गाव आणखी एका ऐतिहासिक ठेव्याशी जोडून राहील.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
December 17, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/सांगली/
महाराष्ट्राच्या या गावात सापडला 800 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा 'साक्षीदार', गावकऱ्यांची एकच गर्दी









