BMC Election: BMC साठी संजय राऊतांकडून युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्ट सांगितलं...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
Sanjay Raut Meet Sharad Pawar: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी शरद पवारांनी ठाकरेंसोबतच्या आघाडीवर सूचक भाष्य केले.
मुंबई : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर युती-आघाड्यांसाठीच्या बैठकांचे सत्र जोरात सुरू झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये युती जवळपास निश्चित झाली असून जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटालाही येण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी शरद पवारांनी ठाकरेंसोबतच्या आघाडीवर सूचक भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासमोर शिवसेना आणि मनसे यांच्यासोबत एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला. भाजपच्या पराभवासाठी शिवसेना-मनसे युतीसोबत इतर पक्षांच्या आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे राऊत यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
या भेटीत काँग्रेसच्या भूमिकेबाबतही चर्चा झाली. काँग्रेस या संभाव्य आघाडीत सहभागी होण्यास तयार आहे का, याबाबत शरद पवार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एकदा चर्चा करावी, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. विरोधी पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.
ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी?
advertisement
शरद पवार यांनी युतीच्या जागावाटपाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आधी शिवसेना आणि मनसे यांनी आपापसातील जागावाटप निश्चित करावे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागांचा प्रस्ताव आम्ही मांडू, असे पवार यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक संख्येने जागा दिल्या जाव्यात, अशी अटही त्यांनी घातल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता चर्चेत आली आहे. आगामी निवडणुकांआधी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील समन्वय कसा घडतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: BMC साठी संजय राऊतांकडून युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्ट सांगितलं...






