बाप्पाची अशी मूर्ती राज्यात कुठंच पाहिली नसेल! साताऱ्यात वसलंय प्रसिद्ध मंदिर
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
असं म्हणतात की, 47 वर्षांपूर्वी इथं पंचमुखी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अक्कलकोटच्या श्री स्वामी गजानन महाराज यांनी केली होती. तेव्हापासून इथं भाविक पंचमुखी बाप्पाच्या दर्शनाला येतात.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : बापाला आतापर्यंत तुम्ही विविध रूपात पाहिलं असेल. गणेशोत्सवात घरोघरी आकर्षक आरास करून विविध रूपातील बाप्पाची स्थापना केली जाते. त्याचप्रमाणे देशातील अनेक मंदिरांमध्येही गणराय अनेक रूपांमध्ये वसलेला आहे. परंतु तुम्ही कधी पंचमुखी गणरायाची मूर्ती पाहिलीये का?
साताऱ्यातील पंचमुखी गणपती मंदिराची देशभरात ख्याती आहे. या मंदिराची प्रतिष्ठापना माघ शुद्ध चतुर्थी शके 1898 रविवार, दिनांक 23 जानेवारी 1977 रोजी करण्यात आली होती. असं म्हणतात की, 47 वर्षांपूर्वी इथं पंचमुखी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अक्कलकोटच्या श्री स्वामी गजानन महाराज यांनी केली होती. तेव्हापासून इथं भाविक पंचमुखी बाप्पाच्या दर्शनाला येतात. विशेष म्हणजे 47 वर्षे होऊनदेखील आजही ही मूर्ती सुस्थितीत आहे.
advertisement
या गजाननाच्या उत्पत्तीबाबत काही अख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच प्रचलित मालिनी राक्षसीणीची कथा. सोमेश्वर येथील शिवलिंगाचा महिमा असा होता की, त्याच्या नुसत्या दर्शनानं महापतकीसुद्धा स्वर्गात जाऊ लागले. स्वर्गाकडे एवढ्या सहज लोटणारं हे शिवलिंग पाहून देवही चिंतेत पडले. या शिवलिंगात जीव यावा यासाठी त्यांनी देवी पार्वतीकडे प्रार्थना केली. तेव्हा पार्वती देवीनं उटणं लावून आपल्या शरिरावरील मळ एकत्र करून गडगासागर तीर गाठलं. तिथं मालिनी राक्षसीण होती. तिचं तोंड हत्तीसारखं होतं. देवीनं सोबत आणलेलं उटणं आणि मळाचं मिश्रण तिथंच टाकलं, जे मालिनी राक्षसीणीनं भक्ष्य केलं, पुढं ती गरोदर राहिली, या राक्षसिणीच्या पोटी एक अपत्य जन्मलं. त्याला 5 सोंडी होत्या. त्यातूनच पंचमुखी गणपतीची निर्मिती झाल्याचं म्हटलं जातं.
advertisement
कर्नाटकात पंचमुखी गणपती मूर्ती पाहिल्यानंतर साताऱ्यातही अशीच पंचमुखी गणपती मूर्ती तयार करण्याचा निर्णय मंदिराच्या जुन्या ट्रस्टींनी घेतला होता. पुढं अशी मूर्ती तयार करून तिची साताऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याकडून सातारच्या खनाळी इथं शंभर वर्षांच्या करारावर जागा घेतली. दरम्यान, साताऱ्यातील पंचमुखी गणपतीची मूर्ती राजस्थानच्या जोधपूरमधून तयार करून आणल्याचं मंदिराचे सचिव राहुल काटकर यांनी सांगितलं. आज इथं मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 25, 2024 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
बाप्पाची अशी मूर्ती राज्यात कुठंच पाहिली नसेल! साताऱ्यात वसलंय प्रसिद्ध मंदिर