मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांचा मोठा खेळ, तातडीने फिरवले फोन, मविआत होणार उलथापालथ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबई महानगर पालिकेत शरद पवार मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना तातडीने फोन फिरवले आहेत.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी एकला चलोची घोषणा केली. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं. तसेच त्यांनी मनसेला सोबत घेण्यासही विरोध दर्शवला. या घडामोडीनंतर महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, आता मुंबई महानगर पालिकेत शरद पवार मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना तातडीने फोन फिरवले आहेत. मुंबई महानगरपालिका कशी लढायची? यावर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदिल दिला होता.
advertisement
मात्र शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार? यावर स्पष्टता नव्हती. यावर पुढील बैठकीत शरद पवार निर्णय घेऊ शकतात. मात्र आता शरद पवार मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. मनसेला सोबत घेऊन राज्यात सत्याचा मोर्चा काढला आता निवडणूक स्वबळावर का लढायची? अशी भूमिका शरद पवारांची असल्याची माहिती आहे.
advertisement
विशेष म्हणजे मनसेला सोबत घेण्यास सुरुवातीपासून काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मित्रपक्ष आहे. असं असूनही शरद पवारांनी मनसेला सोबत घेण्यास सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीने मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवली पाहिजे, एखादा पक्ष सोबत येत असेल तर त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे, असंही पवारांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांनी एकप्रकारे काँग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढण्याला अप्रत्यक्ष विरोध केला असून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षासोबत युती करण्याचा प्रस्तावही त्यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिका मागे घेतली नाही, तर मुंबई महापालिकेत शरद पवार मनसे आणि ठाकरे गटाला सोबत घेऊन एक वेगळा प्रयोग करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांचा मोठा खेळ, तातडीने फिरवले फोन, मविआत होणार उलथापालथ


