विलिनीकरणानंतर अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते का? NCP च्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
जर दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते तर मग अजित पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडणार होते का? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारला.
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले मत मांडल्याने आता प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अजित पवार यांची इतर नेत्यांशी विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू असती तर मला सांगितले असते, असे म्हणून अशा कोणत्याही चर्चा सुरू नव्हत्या, असेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले. तसेच जर दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते तर मग अजित पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडणार होते का? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारला. त्यांच्या याच प्रश्नाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले.
शशिकांत शिंदे म्हणाले, मला यामध्ये राजकारण करायचे नाही. दादांच्या जाण्यानंतर आम्ही कुणी राजकीय फायदा उठवतोय असे चित्र महाराष्ट्रासमोर जाणे दुर्दैवी आहे. अजित पवार यांच्या अस्थींची शपथ घेऊन सांगतो, माझे त्यांच्याशी भावनिक नाते आहे. अजित पवार यांनी आमच्याशी विलिनीकरणाबाबत चर्चा केली होती.
अजित पवार सरकारमध्ये राहणार होते की बाहेर पडणार होते?
advertisement
विलिनीकरणानंतर अजित पवार सरकारच्या बाहेर पडणार होते का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केल्यावर शशिकांत शिंदे म्हणाले, यावरही अजित पवार यांनी आमच्याशी चर्चा केली होती. ते आम्हाला म्हणाले होते की माझी यासंदर्भाने वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. आपल्या दोन्ही पक्षाच्या स्वतंत्र बैठका होतील. त्या बैठकीत आपण धोरणे ठरवून टाकू. मग धोरणे जाहीर करून आपण विलिनीकरणासंदर्भात अंतिम पाऊल टाकू.
advertisement
आता दुर्दैवाने अजित पवार हयात नाही. त्यांच्या माघारी आता कुणी साक्षीदार कुणी उभे करावे, एवढे आमचे काळीज निष्ठुर नाही. मला वाटते की जर त्यांना विलिनीकरण करायचे नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे की आम्हाला असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही. माणूस गेल्यानंतर त्याची काय इच्छा होती हे व्यक्त करणे हे आमचे काम होते. त्याला राजकीय रंगू देण्याचा कुणी प्रयत्न करू नये. जो काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी तो घ्यावा. आम्हीच मागे लागलोय, असे चित्र उभे राहणे चांगले नाही. मी शपथ घेऊन सांगतोय आमची चर्चा झालीच होती.
advertisement
आम्हाला जर फायदाच उठवायचा असता तर नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेच होते की... परंतु त्यावेळी आम्ही नम्रपणे नकार दिला होता, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. आम्हाला भावनिक राजकारण करायचे नाही, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 4:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विलिनीकरणानंतर अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते का? NCP च्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट







