महापालिकेत दारुण पराभव, ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा, ओपन लेटर लिहीत काँग्रेस नेत्याचं कौतुक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईसह राज्यभरात म्हणावं तसं यश संपादन करता आलं नाही.
ज्ञानेश्वर सालोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: राज्यातील २९ महानगर पालिकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. अनेक ठिकाणी भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. पण या सगळ्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. इथं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून २५ वर्षांचा गड ढासळला आहे. इथं भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं सत्ता काबीज केली आहे. इतरही महानगर पालिकांमध्ये ठाकरे गटाला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही.
कोल्हापूर महापालिकेत देखील ठाकरे गटाला खातं उघडता आलं नाही. इथं भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून ८१ पैकी ४२ भाजपनं जिंकल्या आहेत. तर ३८ जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. कोल्हापूर महानगर पालिकेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी ओपन लेटर लिहित काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी निष्ठा कायम ठाकरेंसोबत राहील, असंही पत्रात म्हटलं आहे.
advertisement
सुनील मोदींनी पत्रात काय म्हटलं?
सुनील मोदी पत्रात म्हणाले, "मा. उद्धवजी ठाकरे साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र... कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारून, मी कोल्हापूर शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसला. वारंवार वरिष्ठांना याची कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही. तरीही पक्षाची प्रतिमा, युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला."
advertisement
"विशेषतः काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, ते उल्लेखनीय असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा, राजकीय जबाबदारी स्विकारून निर्णय घेणे हे शिवसेनेच्या संस्कृतीला साजेसे आहे, या भावनेतूनच हा राजीनामा देत आहे."
"मात्र याचा अर्थ पक्षाशी निष्ठा कमी होणे असा नसून, यापुढेही मी मातोश्रीशी एकनिष्ठ राहून, कोणतेही पद न स्वीकारता, एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत राहीन. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, ही नम्र विनंती." - आपला निष्ठावंत, सुनील मोदी.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापालिकेत दारुण पराभव, ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा, ओपन लेटर लिहीत काँग्रेस नेत्याचं कौतुक









