Solapur Flood: आभाळ फाटलं! सीना नदीला महापूर, पुणे-सोलापूर वाहतूक बंद, 29 गावांना पुराचा वेढा, शाळांना सुट्टी
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Flood: सोलापुरातील सीना आणि भागावती नद्यांना महापूर आला असून 6 तालुक्यांना फटका बसला आहे. सोलापूर – पुणे महामार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
सोलापूर: मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सीना नदीला महापूर आला असून सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या 29 गावांना पुराचा वेढा बसला आहे. तर 124 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आतापर्यंत जवळपास 200 जणांची सुखरुप सुटका करण्यात यश आलंय. महापुरामुळे सीना नदीवरील लांबोटी पूल पहिल्यांदाच बंद करण्यात आला आहे. रात्री 11.30 वाजलेपासून पुणे-सोलापूर रस्ता बंद असून सावळेश्वर टोलनाक्यावर गाड्या अडवून ठेवल्या आहेत.
पुणे-सोलपूर वाहतूक ठप्प
सीना नदीने रौद्ररुप धारण केले असून नदी पात्राबाहेर वाहत आहे. त्यामुळे लांबोटी येथील पुलावरून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे. विशेष म्हणजे नवा पूल झाल्यापासून पहिल्यांदाच सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री 11.30 नंतर सावळेश्वर टोलनाका येथे वाहने थांबवून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
सोलापुरात पुराचा विळखा
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली आहे. माढा तालुक्यातील शिंगेवाडी, वाघेगव्हाण, मुंगशी लव्हे, तांदूळवाडी, दारफळ, सुलतानपूर, कैवड, वाकाव, खैराव, कुंभेज आदी 10 हून अधिक गावे पाण्यात गेली आहेत. मोहोळ तालुक्याला देखील पुराचा मोठा फटका बसला आहे. मलिकपेठ, भोयरे, घाटणे, लांबोटी, अर्जुनसोंड, मुंढेवाडी, पोफळी आदी गांवांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले गावासह अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
अनेक गावांची वाहतूक ठप्प
सोलापुरातून वाहणाऱ्या सीना आणि भोगावती नद्यांना पूर आला आहे. अनगर, नरखेड, बोपले-अनगर, आष्टे-मोहोळ, नरखेड-वडाळा, नरखेड-मोहोळ, नरखेड-वैराग या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कुर्डुवाडीतील नागरी वस्तीत पाणी शिरले असून यावली ते वैरागचा संपर्क तुटला आहे. वैराग-धाराशिव रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेल्याने वाहतूक ठप्प आहे. मोहोळमधील जाधव वस्ती, वाळूज बसस्थानकाला पाण्याचा वेढा आहे. नदी काठच्या लोकांचे शाळा, समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आले आहे
advertisement
दरम्यान, सीना नदीत दोन लाख क्युसेक विसर्ग झाल्याने मोहोळमधील बोपले, अनगर, मलिकपेठ, आष्टे, भोयरे, डिकसळ, देगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.
एअरलिफ्टिंगद्वारे नागरिकांची सुटका
माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरिकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणीही पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना आर्मीच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे.
advertisement
शाळांना सुट्टी
सोलापुरातील गंभीर पूरस्थिती विचारात घेऊन मंगळवारी शाळा महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता पुन्हा एक दिवसाची सुट्टी वाढवण्यात आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांना सुट्टी देण्यात आलीय. जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
दोन महामार्ग बंद, एसटीची चाके थांबली
सोलापूर पुणे आणि सोलपूर कोल्हापूर या दोन्ही महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे सोलापूर जंक्शन येथे प्रवाशांची मोठी गर्दी झालीये. सीना नदी पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक रस्ते बंद झाल्याने एसटीची चाके देखील थांबली आहेत. तर सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला देखील पावसाचा फटका बसला आहे. सकाळी सहा वाजलेपासून वंदे भारत सोलापूर स्थानकातून निघालेली नाही. तसेच इतर रेल्वेही ठप्प आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 24, 2025 9:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Flood: आभाळ फाटलं! सीना नदीला महापूर, पुणे-सोलापूर वाहतूक बंद, 29 गावांना पुराचा वेढा, शाळांना सुट्टी