ST पास घरी राहिला, कंडक्टरने पाचवीतील प्रथमेशला हायवेवर उतरवलं, रडणंही ऐकलं नाही
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथं एका एसटी कंडक्टरने एका पाचवीत शिकणाऱ्या बालकाला हायवेवर उतरवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथं एका एसटी कंडक्टरने एका पाचवीत शिकणाऱ्या बालकाला हायवेवर उतरवलं आहे. त्याच्याकडे एसटी बसचा पास नाही. शिवाय तिकीटासाठी पैसे नाहीत, या कारणामुळे चिमुकल्याला चक्क भर हायवेवर बसमधून खाली उतरवलं. या गंभीर घटनेमुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी मंगळवेढ्यात पाचवीत शिकतो. शनिवारी शाळा सुटल्यानंतर तो नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढला. बसमधून प्रवास करत असताना कंडक्टरने प्रवाशांचे तिकीट तपासण्यास सुरुवात केली. जेव्हा कंडक्टर प्रथमेशजवळ आले, तेव्हा त्यांनी त्याला बस पास मागितला. प्रथमेशने दप्तरात शोधले, मात्र गडबडीत त्याचा पास घरीच राहिला होता.
advertisement
'माझ्या पप्पांना फोन करा', चिमुकल्याची केविलवाणी विनवणी
पास घरी राहिल्याचे लक्षात आल्यावर कंडक्टरने त्याला तिकीट काढण्यास सांगितले. मात्र, प्रथमेशकडे तिकीटासाठी पैसे नव्हते. घाबरलेल्या चिमुकल्याने कंडक्टरला विनंती केली की, "माझ्या वडिलांना फोन करा, ते तुम्हाला पैसे देतील किंवा घरी गेल्यावर पैसे मिळतील." मात्र, त्या कंडक्टरला त्या लहान मुलाच्या डोळ्यातील पाणी दिसले नाही. पास नाही आणि पैसेही नाहीत, तर बसमध्ये बसायचे नाही, असे सांगत कंडक्टरने एसटी थांबवून प्रथमेशला मंगळवेढा-सोलापूर या चार पदरी हायवेवर खाली उतरवून दिले.
advertisement
लिफ्ट मागून गाठले घर
भर हायवेवर अनोळखी जागी उतरवल्यामुळे १०-११ वर्षांचा प्रथमेश प्रचंड घाबरला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. शेवटी, रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला त्याने हात करून थांबवले आणि त्याच्या मदतीने कसाबसा आपले घर गाठले. घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
केवळ पास नसल्याने एका लहान मुलाला हायवेवर सोडून देणं हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. जर त्या मुलाच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला असता, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. याप्रकरणी संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रथमेशच्या पालकांनी केली आहे.
view commentsLocation :
Mangalvedhe (Mangalwedha),Solapur,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST पास घरी राहिला, कंडक्टरने पाचवीतील प्रथमेशला हायवेवर उतरवलं, रडणंही ऐकलं नाही









