उन्हाच्या चटक्यांनी हैराण ठाणेकरांना मोठा दिलासा, यंदा पाणीकपातीचं नो टेन्शन!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Thane Water Supply: गेल्या काही दिवसांत उन्हाच्या चटक्यांनी ठाणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. अशाचत एक दिलासादायक बातमी आहे. यंदा पाणीकपातीचं टेन्शन असणार नाही.
ठाणे : गेले काही दिवसांत ठाण्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. उकाड्याने हैराण ठाणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ठाणेकरांना यंदा मुबलक पाणी देण्यासाठी महापालिका तुर्तास सज्ज असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्याच्या घडीला मुबलक पाणीसाठा असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलंय. जलसंपदा विभागाकडूनही अद्याप पाणी कपात करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे ठाणेकरांना तुर्तास मोठा दिलासा आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एमआयडीसी, मुंबई महापालिका, भातसा धरण, स्टेम प्राधिकरण आदी ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणात सध्याच्या घडीला मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे ठाणेकरांची चिंता सध्या मिटलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. बारवी धरणातून कल्याण-डोंबिवली पालिका, एमआयडीसी, 27 गावे, बदलापूर-अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई, ठाणे पालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा, तळोजा औद्योगिक क्षेत्र, मीरा-भाईंदर शहरांना दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो.
advertisement
या धरणातून दररोज सुमारे 900 ते 1100 दशलक्ष लिटर पाणी वितरित केले जाते. दरवर्षी 15 जूनपर्यंत पुरेल इतक्या धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येते. त्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणीकपात लागू करण्यात येते. यामुळे आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. पाऊस सुरू होईपर्यंत ही कपात लागू असते. परंतु, मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या तरी ठाणेकरांना पाणीकपातीच्या संकटातून दिलासा मिळाला आहे. तरीही पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.
advertisement
जुलैपर्यंत नियोजन
सध्या 585 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा ठाणे शहराला होतो. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसरत होते. येत्या जुलैपर्यंत हा पाणीसाठा पुरावा, यादृष्टीने त्याचे नियोजन केले जात आहे. इतर वापरांसाठी कूपनलिका वापरात आणल्या जात आहे. महापालिकेच्या मालकीच्या इमारती, कार्यालये यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर होत आहे.
असा होतो पाणीपुरवठा!
250 - महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून
advertisement
115 - स्टेम प्राधिकरणाकडून
135 – एमआयडीसीकडून
85 - मुंबई महापालिकेकडून
(पाणीपुरवठा दशलक्ष लिटरमध्ये)
पर्यायी व्यवस्था
डोंगराळ परिसरात ज्या ठिकाणी पालिकेच्या यंत्रणेमधून कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन कूपनलिका खोदण्यात येऊन हातपंप बसविले आहे. “ठाणे महापालिका हद्दीत मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे सध्या तरी कुठेही पाणी कपात करण्यात आलेली नाही. शहरात सध्या पाणीपुरवठा सुरळीत असून पाणीकपातीबाबत कोणतेही निर्देश प्राप्त नाहीत,” असं पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनोद पवार यांनी सांगितलंय.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
February 28, 2025 9:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
उन्हाच्या चटक्यांनी हैराण ठाणेकरांना मोठा दिलासा, यंदा पाणीकपातीचं नो टेन्शन!