Kalyan: ऐन पावसाळ्यात कल्याणमध्ये पाणीबाणी, मंगळवारी इतके तास पाणीपुरवठा राहणार बंद
- Published by:Mohan Najan
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
कल्याणकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण: कल्याणकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या कल्याण-पूर्व या भागात उद्या दिनांक 5 ऑगस्ट रोजी सुमारे आठ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
कल्याण-पूर्व भागात पाणीटंचाई येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. या विरोधात अनेकदा कल्याणकर रस्त्यावर देखील उतरले होते. कल्याण-पूर्व शहराला बारावे जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणी पुरवठा केला जातो. या जलशुद्धीकरण केंद्रात मंगळवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. उल्हास नदीमधून कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी उचलले जाते.
advertisement
ऐन पावसाळ्यात नदीमधील वाहून येणारा गाळ तसेच कचरा, माती यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवर ताण येतो. त्यामुळे सुमारे आठ तास या जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असून या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मंगळवारी दिवसभर आठ तास कल्याण-पूर्व भागातील कोळसेवाडी, काटेमानिवली, विजयनगर, चिंचपाडा, खडेगोळवली, तिसगाव, चक्कीनाका, मलंगगड रस्ता, लोकग्राम परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 04, 2025 8:54 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Kalyan: ऐन पावसाळ्यात कल्याणमध्ये पाणीबाणी, मंगळवारी इतके तास पाणीपुरवठा राहणार बंद