Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
- Reported by:BALAJI NIRFAL
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Tuljapur Drug Case Arrest : तुळजापूर एमडी ड्रग्ज रॅकेटचा गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
धाराशिव: तुळजापूर एमडी ड्रग्ज रॅकेटचा गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तामलवाडी पोलिसांनी मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरातून अतुल श्याम अग्रवाल याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या अटकेमुळे बहुचर्चित प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत. राज्यभर खळबळ उडालेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातील राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. विशेषतः नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमडी ड्रग्जवरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. या प्रकरणाने केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच नाही, तर राजकीय वातावरणही तापले होते.
अतुल अग्रवाल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून गेली सुमारे २० वर्षे तो मुंबईत वास्तव्यास आहे. मीरा-भाईंदर परिसरात एका लाँड्रीच्या दुकानाच्या आडून तो एमडी ड्रग्जचा काळा बाजार चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्येही मुंबईत त्याच्यावर ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
advertisement
या प्रकरणात आतापर्यंत ३९ आरोपींना अटक करण्यात आली असून, अग्रवालच्या अटकेनंतर ड्रग्ज तस्करीचे व्यापक जाळे, आर्थिक व्यवहार आणि राजकीय-सामाजिक संबंध यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीनंतरच मुख्य आरोपीला अटक झाल्याने “निवडणुकीपूर्वी ही कारवाई का झाली नाही?” असा सवालही आता उपस्थित केला जात असून, या अटकेवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
> प्रकरण काय?
एप्रिल 2025 मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तुळजापुरातील तामलवाडी येथून एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली. या प्रकरणी तुळजापूर मंदिरातील १३ पुजारींचा ड्रग्स तस्करीत सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर काही राजकीय लागेबंध असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती.
view commentsLocation :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!










